News Flash

जेव्हा पोकेमॉन सीरियात सापडतो !

सीरियातल्या परिस्थितीवर जगाचे लक्ष खेचण्याची कलाकाराची धडपड

‘पोकेमॉन गो’ या खेळाने सगळ्यांनाच वेड लावले. यात सगळे म्हणजे फक्त भारतीय नव्हे तर जगभरातले सगळेच आले. हा खेळ येऊन काही दिवस झाले नाही तोच हा खेळ तूफान प्रसिद्धही झाला आणि वादातही सापडला. आतापर्यंत या खेळामुळे चांगले काहीच घडले नाही उलट या खेळामुळे अमेरिकेत दोघांचा जीव गेला तर काही ठिकाणी या खेळामुळे अनेकांना अपघातही झाला अशी सबब पुढे करत या खेळावर बंदी घालण्याची मागणीही अनेकांनी केली. पण याहून पुढे जाऊन या खेळाचा आणि यात असणाऱ्या विविध पात्रांचा उपयोग एका मोठ्या समस्येकडे जगाचे लक्ष खेचण्यासाठी करण्यात आला आहे. आणि हा प्रयत्न अनेक नेटिझन्सचे लक्ष आपल्याकडे खेचून घेत आहे. मूळचा सिरिअन असलेल्या खालिद अकिल या प्रसिद्ध मिक्समीडिया आर्टिस्ट आणि छायाचित्रकाराने पोकेमॉनचा उपयोग सीरियातल्या युद्धपरिस्थितीवर जगाचे लक्ष खेचण्यासाठी केला आहे.
पोकेमॉनला शोधण्यासाठी अनेकजण दूर दूर चालतात आणि मग त्यांना पोकेमॉन भेटतो. याच संकल्पनेचा वापर करत खालिद याने काही फोटो ट्विटरवर शेअर केले. युद्धाच्या झळा बसलेल्या अनेक लहान मुलांच्या हातात त्याने पिक्काचुचे चित्र दाखवले आहे. या फोटोंना त्यांनी ‘पोकेमॉन गो इन सिरिया’ असे नाव दिले आहे. या पोकेमनला शोधत कोणीतरी या युद्धाने बेचिराख झालेल्या शहरात येईल आणि त्याला खरी परिस्थिती कळेल एवढाच त्याचा हेतू. कुठे इमारती पडल्यात, कुठे नुकताच हल्ला झालाय, हल्ल्याने ढासळून पडलेल्या कोणाच्या घराच्या विटा इथल्या युद्धाची करूण कहाणी सांगतोय. या सगळ्या हृदयद्रावक छायाचित्राच्या बाजूला त्याने पोकेमॉन दाखवले आहेत. या पोकेमनला शोधण्याच्या नादात तरी बालपण गमावेल्या मुलांच्या दुःखाकडे जगाची नजर जाईल या भाबड्या आशेने त्यानी हे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. खालिद मुळचा सीरियाचा, पण सीरियात सुरू असलेल्या नागरी युद्धामुळे तो या देशातून बाहेर पडला आहे. नागरीयुद्धामुळे नाहक मारल्या जाणा-या निरपराध लोकांसाठी त्याचा जीव रोज तुटतो. असे म्हणतात की कलाकाराच्या कलेत ताकद असते. या ताकदीचा खालिदने अगदी योग्य वापर करून ‘पोकेमॉन गो’च्या काल्पनिक दुनियेत रमलेल्या जगाला वास्तवात आणण्याचा प्रयत्न केला आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 25, 2016 4:58 pm

Web Title: when pokemon found in syria
Next Stories
1 सुप्रीम कोर्टाकडून अपवादात्मक परिस्थितीत गर्भपाताला मान्यता
2 ‘आप’ला घाबरून भाजप आनंदीबेन पटेल यांना हटविण्याच्या तयारीत, आशुतोष यांचा दावा
3 संशयास्पद वाहन सापडल्याने लंडनमधील रेल्वे स्थानकावर खळबळ
Just Now!
X