भारतीय जनता पक्षाच्या ज्येष्ठ नेत्या, माजी परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांचे मंगळवारी रात्री नवी दिल्लीतील ‘एम्स’ रुग्णालयात निधन झाले. त्या ६६ वर्षांच्या होत्या. कार्डिअॅक अरेस्टमुळे त्यांचे निधन झाले. त्यांच्या निधनानंतर अनेक बड्या नेत्यांनी आपले वैयक्तिक नुकसान झाल्याची भावना व्यक्त केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन, भारतीय राजकारणातलं एक तेजोमय पर्व हरपलं अशा शब्दात आपल्या भावना व्यक्त केल्या. सुषमा स्वराज यांचं अत्यंदर्शन घेण्यासाठी जंतर मंतर येथील त्यांच्या निवासस्थानी कार्यकर्ते आणि नेत्यांनी गर्दी केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदीदेखील सुषमा स्वराज यांचं अंत्यदर्शन घेण्यासाठी पोहोचले होते. यावेळी नरेंद्र मोदी भावूक झालेले दिसले. त्यांच्या डोळ्यातून अश्रू वाहत होते. मोदी आणि सुषमा स्वराज यांचे खास नाते होते. मोदींनी अभिनेता अक्षय कुमारला दिलेल्या एका मुलाखतीमध्ये सुषमा स्वराज यांच्याबद्दलचा एक प्रसंग सांगितला होता ज्यामध्ये सुषमा स्वराज यांनी मोदींनी माझ्या सांगण्यानुसार तुम्हाला करावचं लागेल असं सांगितलं होतं.

सुषमा स्वराज या त्यांच्या भाषणांसाठी, स्पष्ट वक्तेपणासाठी ओळखल्या जायच्या. त्यांच्या या गुणांची झलक अगदी लोकसभेतील भाषणांपासून ते निवडणुक प्रचारापर्यंत ते अगदी संयुक्त राष्ट्रांच्या भाषणांमध्येही दिसून यायची. स्वराज यांच्या याच स्वभावाबद्दलचा एक अनुभव मोदींनी अक्षय कुमारशी बोलताना सांगितला होती. सुषमा स्वराज यांनी मला वाचून भाषण करण्याची सक्ती केली होती अशी आठवण मोदींनी सांगितली होती.

२०१४ साली निवडून आल्यानंतर मोदींनी अमेरिकेचे दौरा केला होता. संयुक्त राष्ट्रांच्या समितीच्या बैठकीसाठी मोदी न्यू यॉर्कला गेले होते. भारताचे पंतप्रधान म्हणून मोदी पहिल्यांदाच संयुक्त राष्ट्राच्या व्यासपिठावरुन भाषण देणार होते. याच भाषणाबद्दल अक्षय कुमारने प्रश्न विचारला असता मोदींनी सुषमा स्वराज यांच्याबद्दलची एक आठवण सांगितली. “अती आत्मविश्वास ही माझी अडचण होती. भाषण कसे द्यायचे याचा मी मनात विचार करुन ठेवला होता. मी जेव्हा संयुक्त राष्ट्रांच्या बैठकीसाठी पोहचलो तेव्हा सुषमाजी आधीपासून तेथे उपस्थित होत्या. मी त्यांची भेट घेतली. या भेटीमध्ये त्यांनी मला माझ्या भाषणाबद्दल विचारले. त्यावेळी मी संभाळून घेईल असं त्यांना सांगितलं. हे असं चालणार नाही असे उत्तर सुषमाजींनी मला दिले. माझ्याबरोबरचे अधिकारी मला स्पष्टपणे हे सांगू शकत नसल्याने त्यांनीच मला हे सांगितले. अशाप्रकारे उस्फुर्त पद्धतीचे भाषण देण्याऐवजी तुम्ही लिहीलेले भाषण वाचा असा सल्ला त्यांनी मला दिला,” असं मोदी म्हणाले. “या भाषणाच्या मुद्द्यावर आमची चांगली अर्धा तास चर्चा झाली. पण त्या त्यांच्या भूमिकेवर ठाम राहिल्या. अखेर चर्चेच्या शेवटी त्यांनी या प्रकरणात तुमचं काहीही चालणार नाही, तुम्हाला माझं ऐकावचं लागेल असे सांगितले. त्यानंतर मी त्यांना काय भाषण देणार आहे हे सांगितले आणि माझे भाषण पेपरवर छापून तयार करण्यात आले. पण मी त्याआधी कधीही वाचून भाषण दिले नसल्याने कागदावरील वाचून भाषण देताना मला अडचण आली,” अशी आठवण मोदींने अक्षयला मुलाखतीमध्ये सांगितली.

या मुलाखतीचा व्हिडिओ सुषमा स्वराज यांनीच ट्विटवरुन ट्विट केला होता. “तुम्हाला ती घटना जशीच्या तशी लक्षात आहे. हे तुमचे मोठेपण आहे,” अशा शब्दांमध्ये सुषमा स्वराज यांनी मोदींचे आभार मानले होते.

या प्रसंगावरुनच कोणीही समोर असले तरी सुषमा स्वराज यांनी आपला स्पष्ट वक्तेपणा कधी सोडला नाही हेच दिसून येते.