लोकशाहीत राजकीय पक्षांचा निवडणुकांतील विजय आणि पराभव ही स्वाभाविक बाब आहे हीच लोकशाहीची नीती आहे. राजकीय पक्षांना विजय पचवणे जसे महत्वाचे आहे तसेच पराजय देखील खिलाडू वृत्तीने स्विकारता आला पाहिजे. मात्र, २०१४ पासून मी पाहतोय की जे लोकशाहीचा सारखा उल्लेख करतात ते आपला पराजय खिलाडू वृत्तीने घ्यायचे संस्कार विसरले आहेत. त्रिपुरातील भाजपाच्या विजयानंतर आजच्या डाव्यांच्या टिकात्मक प्रतिक्रियांनी मी आश्चर्यचकित झालो आहे. त्रिपुरात आम्ही शुन्यातून शिखरापर्यंत पोहोचलो आहोत, असे सांगताना सूर्य मावळतो तेव्हा त्याचा रंग लाल होतो, पण उगवतो तेव्हा भगव्या रंगाचा दिसतो, अशा शब्दांत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्रिपुरातील विजयाचे वर्णन केले.

ईशान्य भारतातील त्रिपुरा आणि नागालँडमधील निवडणुकीतील विजयानंतर दिल्लीतील भाजपाच्या नव्या मुख्यालयात पंतप्रधान नरेंद्र मोदींनी लोकांना संबोधीत केले. तत्पूर्वी भाजपाध्यक्ष अमित शहा यांनी जनतेला संबोधीत केले. यावेळी मोदींच्या भाषणादरम्यान अजान सुरु झाल्याने त्यांनी दोन मिनिटांसाठी आपले भाषण थांबवले.

मोदी म्हणाले, भारतीय जनता पार्टीच्या अनेक निर्दोष कार्यकर्त्यांना राजकीय विचारधारेमुळे आपला जीव गमवावा लागला. या शहीद कार्यकर्त्यांना ईशान्येतील हा विजय मी अर्पण करतो असे ते यावेळी म्हणाले. भय आणि भ्रम या दोन शस्त्रांमुळे तसेच विशेषतः माओवादी विचार आणि डाव्यांच्या अन्यायाला कंटाळून गरीब मतदारांनी मतदानाद्वारे त्यांना उत्तर दिले.

भाजपाविरोधात अपप्रचार होत असतानाही दूर त्रिपुरात भाजपाची सत्ता आली ती केवळ सामान्य माणसाच्या मनातील भाजपाच्या प्रेमामुळेच असा दावाही यावेळी मोदींनी केला. वास्तुशास्त्रात इमारतीचा ईशान्य कोपरा महत्वाचा मानला जातो. एकदा का ईशान्य बाजू व्यवस्थित झाली की संपूर्ण इमारत व्यवस्थित होते, या सुत्रानुसार आता ईशान्य भारत विकासाचे नेतृत्व करण्यासाठी पुढे आले आहे, असेही मोदी यावेळी म्हणाले.

सामान्यातल्या सामान्य कार्यकर्त्यांना योग्य गोष्टी समजावून सांगून त्यांचे हृदय जिंकून त्याचे मतात रुपांतर करता येते, ही बाब राजकीय विश्लेषकांनीही ध्यानात घ्यावी. भाजपाने आपल्या संघटनाच्या जोरावर त्रिपुरात विजय खेचून आणल्याचा दावा यावेळी त्यांनी केला. ईशान्य भारतात भाजपाचा कोणताही चेहरा नसतानाही हा बदल घडून आला. इथल्या लोकांना कायमच दिल्ली आमच्या पासून दूर असल्याचे वाटत होते. मात्र, आम्ही दिल्ली तुमच्या दारात असल्याचे त्यांना सांगितले, त्यामुळेच भाजपाचा येथे विजय झाला असे मोदी म्हणाले.