पाकव्याप्त काश्मीरात पुन्हा एकदा पाकिस्तानविरोधात आवाज उठवण्यात आला आहे. शनिवारी येथील एका नेत्याने पाकिस्तानचा दावा खोडून काढला. ‘काश्मीर तुमचा आहे असं कुठ लिहलंय. हा पाकिस्तानातील मुस्लिम काँन्फरन्सचा खोटा प्रचार आहे. ज्याला कसलाही आधार नाही. आमच्या शौचालयांवरही हेच लोक काश्मीर पाकिस्तानचा होणार असे लिहितात’ अशा शब्दांत या नेत्याने पाकिस्तानला सुनावले.

तौकीर गिलानी असे या बंडखोर नेत्याचे नाव असून तो म्हणाला की, मीरवाईज उमर फारुख आणि सज्जाद लोनच्या वडिलांच्या हत्येमागे पाकिस्तानचाच हात आहे. या व्यतिरिक्त लिबरेशन फ्रंटच्या मारल्या गेलेल्या ६५० लोकांच्या मृत्यूला जबाबदार असलेल्या जिहादींना पाकिस्ताननेच समर्थन दिले आहे. पाकिस्तान तथाकथित स्वातंत्र सैनिकांच्या अंत्यसंस्कारासाठी ३० हजार रुपयांची मदतही करतो, हा निव्वळ मुर्खपणाचा कळस आहे. हेच पाकिस्तानी लोक टीव्हीवर काश्मीरी लोक नमक हराम असल्याचे हिणवतात. मात्र, जगात कोणीही घेत नसलेले यांचे मीठ आम्ही वीस रुपयांमध्ये खरेदी करतो, फुकट घेत नाही. आमचे पाणी मात्र तुम्ही पिता अशा शब्दांत तौकीर गिलानीने पाकिस्तानवर कडाडून हल्ला केला.

दरम्यान, काश्मीरच्या नॅशनल कान्फरन्सचे प्रमुख फारुक अब्दुल्ला यांनी पाकव्याप्त पाकिस्तान हा पाकिस्तानचा भाग असल्याचे म्हटले होते. हा पाकिस्तानचा भाग असल्याने भारताकडील काश्मीरच्या लोकांनी त्यांच्या स्वातंत्र्याची मागणी बंद करायला हवी, असेही ते म्हणाले होते. यावर अब्दुल्ला यांना बॉलिवूडचे ज्येष्ठ अभिनेते ऋषी कपूर यांनी पाठींबा दिला होता. या समस्येवरील सुटकेसाठी हाच पर्याय असल्याचे ते म्हणाले होते.

या प्रश्नी केंद्रिय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर यांनी पाकिस्तानकडे असलेला काश्मीर हा भारताचा भाग असून आम्हाला तो मिळवण्यापासून कोणीही रोखू शकणार नाही, असे नुकतेच म्हटले होते.