शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचे वचन देत विधानसभा निवडणूक जिंकून सत्तेत आलेल्या राजस्थानचे काँग्रेस सरकार त्याच मुद्द्यावरुन अडचणीत येण्याची शक्यता आहे. कारण, राज्यातील एका शेतकऱ्याने माझी कर्जमाफी कुठे आहे? असा मुख्यमंत्री गेहलोत यांना सुसाईड नोटमधून सवाल करीत आत्महत्या केली आहे. या प्रकारामुळे राज्यातील राजकारणात खळबळ माजली आहे.

राजस्थानच्या गंगानगर जिल्ह्यातील ठाकरी गावातील सोनहलाल काडेल या ४५ वर्षीय शेतकऱ्याने नुकतीच आत्महत्या केल्याचे समोर आले आहे. तत्पूर्वी त्याने आपण आत्महत्या करीत असल्याचा एक सूचक व्हिडिओ तयार केला तसेच दोन पानाची सुसाईड नोट लिहीली आणि यामध्ये मुख्यमंत्री अशोक गेहलोत आणि उपमुख्यमंत्री सचिन पायलट यांचे नाव घेत निवडणुकीपूर्वी दिलेल्या कर्जमाफीचे वचन पाळण्यात अपयशी ठरल्याचे म्हटले आहे.

आत्महत्या केलेल्या सोहनलाल यांनी आत्महत्येपूर्वी माहिती देणारा एक व्हिडिओ आपल्या मोबाईलवर चित्रीत केला आणि तो आपल्या फेसबुक अकाऊंटवर अपलोड केला. हा व्हिडिओ पाहिल्यानंतर त्याच्या शेजाऱच्या लोकांना त्यांची आत्महत्येची योजना लक्षात आली. दरम्यान, त्यांच्या शोजाऱ्यांना तत्काळ त्यांच्या घराकडे धाव घेतली. मात्र, तोपर्यंत सोहनलाल यांनी विष प्राशन केले होते. त्यानंतर रुग्णालयात उपचारांदरम्यान त्यांचा मृत्यू झाला.

सोहनलाल हे अल्पभूधारक शेतकरी असून आपली शेतजमीन कसण्यासाठी त्यांनी सिंडिकेट्स बँकेकडून १.२३ लाख रुपयांचे पीक कर्ज घेतले होते. मात्र, हे कर्ज फेडणे त्यांना कठीण झाले होते. तसेच नव्या सरकारने जाहीर केलेल्या कर्जमाफीचा लाभही त्यांना मिळू शकला नव्हता. त्यामुळेच त्यांनी कर्जमाफीचे वचन देऊन सत्तेत आलेल्या काँग्रेस सरकारवर आरोप करीत आपले जीवन संपवले.