अमृतसरवरून दिल्लीला येत असलेल्या एअर इंडियाच्या विमानातील खिडकीचे पॅनल तुटून ते पडल्यामुळे यात तिघे प्रवासी जखमी झाले. या अपघातानंतर काही ऑक्सिजन मास्कही बाहेर आले. आकाशात असताना अचानक हा प्रकार घडल्याने विमानात काही काळ गोंधळ उडाला होता. अनेक प्रवासी घाबरले होते. बोइंग ७८७ ड्रीमलायनरचे (VTANI) प्रवासी सुमारे १० ते १५ मिनिटे खूप तणावात होते. विमान प्राधिकरण आणि विमान कंपनीनेही या प्रकरणाची चौकशी सुरू केली आहे. ही घटना गुरूवारी घडली.

सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, AI 462 मध्ये अचानक झटका बसल्याने एका प्रवाशाच्या(१८-अ) डोक्यावर खिडकीचे पॅनल पडले. यात आणखी दोन प्रवासीही जखमी झाले. प्रवाशांनी कदाचित सीट बेल्ट बांधला नव्हता. विमानाच्या आतील खिडकीचे पॅनल पडले. सुदैवाने बाहेरची खिडकी तुटली नाही. परंतु, या प्रकारामुळे प्रवासी घाबरले होते.

विमानातील ऑक्सिजन मास्कही बाहेर आले. आसन क्रमांक १२ यू वरील पॅनल कव्हरलाही तडे गेल्याचे दिसून आले. हा खूप विचित्र अपघात आहे. एअर इंडिया आणि डीजीसीए याचा तपास करत असल्याची माहिती एअर इंडियाच्या वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली.

विमान दिल्लीला लँड करताच जखमी असलेल्या तिन्ही प्रवाशांना रूग्णालयात नेण्यात आले. आमच्या आपात्कालीन पथकाने जखमींची पुरेपूर काळजी घेत रूग्णालयात पोहोचवले. ज्या प्रवाशाच्या डोक्यावर पॅनल पडले त्यांना थोडी गंभीर दुखापत झाली आहे तर इतर दोघांची काळजी करण्यासारखी स्थिती नव्हती. प्राथमिक उपचारानंतर त्यांना संलग्नित विमानाने पुढे पाठवण्यात आले, एअर इंडियाच्या एक वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले. डीजीसीएने या प्रकरणाची चौकशी सुरू केली असून एअरक्राफ्ट अॅक्सिडेंट इन्वेस्टिगेशन बोर्डला याची माहिती देण्यात आली आहे.