शिखांचे धर्मगुरू गुरू नानक यांनी आपल्या आयुष्यातील अखेरची १८ वर्षे भारत-पाकिस्तानच्या सीमेवर असलेल्या कर्तारपूरमध्ये घालवली होती. तेथील धर्मस्थळापर्यंत थेट जाण्यासाठी मार्ग शनिवारी खुला झाला. या कॉरिडॉरच्या उद्घाटन समारंभापूर्वीचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. या व्हिडीओत पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान हे “आमचा सिद्धू कुठे आहे?”, असं विचारताना दिसत आहेत.

इम्रान खान हे कर्तारपूर कॉरिडोरच्या उद्धाटनस्थळी बसमधून जात होते. त्यावेळी “आमचा सिद्धू कुठे आहे? तो आला का?” अशी विचारणा त्यांनी केली. त्यावर सिद्धू आले आहेत, असं उत्तर त्यांना देण्यात आलं. हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

कर्तारपूर उद्घाटन सोहळ्यात सहभागी होण्यासाठी काँग्रेस नेते नवज्योतसिंग सिद्धू पाकिस्तानात पोहोचले होते. या कार्यक्रमात सिद्धू यांनी इम्रान खान यांना सिकंदर म्हणून संबोधित केलं. कर्तारपूर कॉरिडॉर सुरू करून खान यांनी १४ कोटी शीख समुदायातील लोकांचं हृदय जिंकलं आहे, असं ते म्हणाले. “सिकंदरनं भिती दाखवून जगाला जिंकलं होतं. पण इम्रान खान यांनी लोकांचे हृदय जिंकून जग जिंकलं आहे,” असंदेखील ते म्हणाले. यावेळी सिद्धू यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींचेही आभार मानले. मोदी साहेबांनाही ‘मुन्ना भाई’वाली जादू की झप्पी पाठवत आहे, असं ते त्यांच्या खास शैलीत म्हणाले.