आर्थिक वर्ष २०१९-२० च्या पहिल्या तिमाहित आर्थिक विकास दरात (जीडीपी) घट होऊन तो ५ टक्के झाला आहे. जो गेल्या साडेसहा वर्षातील सर्वाधिक खालच्या पातळीवर पोहोचला आहे. मात्र, जागतिक अर्थव्यवस्थेच्या खराब कामगिरीच्या तुलनेत आणि भारतीय अर्थव्यस्थेत आलेल्या सुस्तीच्या पार्श्वभूमीवर हा दर समाधानकारक असल्याचे मत देशाचे मुख्य आर्थिक सल्लागार कृष्णमूर्ती सुब्रमण्यम यांनी व्यक्त केले आहे.

सुब्रमण्यम म्हणाले, केंद्र सरकार अर्थव्यवस्थेला वेग देण्यासाठी अनेक प्रयत्न करीत आहे. जे अर्थमंत्र्यांनी नुकत्याच केलेल्या घोषणांवरुनही दिसून येते. सरकार पाच लाख कोटींची अर्थव्यवस्था बनवण्याचे लक्ष्य साध्य करण्यासाठी तसेच अर्थव्यवस्थेला उर्जितावस्था प्राप्त करुन देण्यासाठी प्रयत्नशील आहे.

केंद्र सरकार अर्थव्यवस्थेबाबत निराश असतानाही त्याचा इन्कार करीत आहे, असा प्रश्न पत्रकारांनी विचारल्यानंतर कृष्णमूर्ती म्हणाले, “आपण ज्या शब्दांचा वापर करीत आहोत त्यावरुन असे वाटते की आपण मंदीच्या काळातून जात आहोत. त्यामुळे आपण काय बोलत आहोत याचा आपण विचार करायला हवा. देशाच्या अर्थव्यवस्थेत सुस्ती आहे तर जगाची अर्थव्यवस्थेची प्रकृती खराब झाली आहे. मात्र, तरीही आपण ५ टक्क्यांच्या दराने पुढे जात आहोत.

एप्रिल ते जून या पहिल्या तिमाहीच्या जीडीपी ५ टक्क्यांवर आला आहे. मागील आर्थिक वर्षातल्या अखेरच्या तिमाहीत म्हणजेच जानेवारी ते मार्च २०१९ या दरम्यान जीडीपी ५.८ टक्के होता. मात्र, आता नव्या आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीत जीडीपी ५ टक्क्यांवर आला आहे. केंद्रीय सांख्यिकी कार्यालयाने दिलेल्या माहितीत हे आकडे समोर आले आहेत. मागील वर्षी हे प्रमाण ८ टक्क्यांच्या वर होते. गेल्या सहा वर्षातला हा सर्वात कमी जीडीपी आहे असेही स्पष्ट करण्यात आले आहे.