भ्रष्टाचाराची प्रकरणे बाहेर काढणाऱयांना सरकारतर्फे सुरक्षा पुरविण्यात येईल, अशी ग्वाही बुधवारी लोकसभेमध्ये देण्यात आली. केंद्र सरकारमधील सर्व विभागातील मुख्य दक्षता अधिकाऱयाकडे कोणताही नागरिक भ्रष्टाचाराविरोधात किंवा पदाचा दुरुपयोग केल्याची तक्रार करू शकतो. यामध्ये संबंधित मुख्य दक्षता अधिकाऱयाला तक्रारीत तथ्य वाटले किंवा मिळालेल्या माहितीत तथ्य आढळल्यास तक्रारदाराला संरक्षण पुरविण्याची शिफारस ते केंद्रीय दक्षता आयुक्तांकडे करू शकतात. केंद्रीय दक्षता आयोगाकडून हा विषय केंद्रीय गृह मंत्रालयाकडे पाठविला जाऊन तक्रारदाराला संरक्षण पुरविण्यात येईल, अशी माहिती लोकसभेमध्ये देण्यात आली. कार्मिक खात्याचे राज्यमंत्री जितेंद्र सिंग यांनी लेखी उत्तरामध्ये याबाबत भूमिका स्पष्ट केली.