अल काईदाचा नेता ओसामा बिन लादेन याचा ठावठिकाणा आयएसआय या पाकिस्तानी गुप्तचर संस्थेने सांगितल्याचा अमेरिकेने इन्कार केला आहे. एका पाकिस्तानी गुप्तचर अधिकाऱ्याने सीआयएला लादेन कुठे आहे याची माहिती दिली होती, असा दावा अमेरिकेतील शोध पत्रकार सेमूर हर्श यांनी केला आहे. लादेनला नंतर एका छाप्यात अमेरिकेच्या नेव्ही सील्सनी ठार केले होते.
सेमूर हर्श यांनी असा दावा केला होता की, पाकिस्तानच्या एका माजी गुप्तचर अधिकाऱ्याने २५ दशलक्ष डॉलर्सच्या इनामाच्या बदल्यात लादेन कुठे आहे याची माहिती अमेरिकेला दिली होती. लादेन त्या वेळी आयएसआयच्या सुरक्षेत अबोटाबाद येथे राहत होता.
व्हाईट हाऊसचे प्रवक्ते जॉन अर्नेस्ट यांनी सांगितले की, लादेनवरील कारवाईबाबत सेमूर हर्श यांनी दिलेली माहिती अचूक नाही व त्यात सत्यापलाप करण्यात आला आहे.
सीआयएचे माजी उपसंचालक माईक मोरेल यांनी सांगितले की, सेमूर हर्श यांचे प्रत्येक वाक्य चुकीचे आहे. सीएनएनचे सुरक्षा विश्लेषक पीटर बेर्गन यांनी सांगितले की, सेमूर हर्श यांचा लेख १० हजार शब्दांचा आहे. त्यात जे खरे आहे ते नवीन नाही व जे नवीन आहे ते खरे नाही, त्यामुळे काळजी करण्याचे कारण नाही.
व्हाइट हाऊस नॅशनल सिक्युरिटी कौन्सिलचे प्रवक्ते एडवर्ड प्राइस यांनी सांगितले की, त्या लेखात अनेक चुका आहेत व त्याला कुठला आधार नाही. आमच्या मते या मोहिमेची माहिती मोजक्याच लोकांना होती, दुसऱ्या कुठल्याही सरकारला माहिती दिली नव्हती त्यात पाकिस्तान सरकारचा समावेश होता. आम्ही काही मोहिमा पाकिस्तानच्या सहकार्याने राबवल्या, पण लादेनला ठार करण्याची मोहीम अमेरिकेची होती. अमेरिकी टीव्ही नेटवर्क एनबीसी न्यूजने म्हटले आहे की, पाकिस्तान सरकारला लादेनचा ठावठिकाणा माहिती होता. निनावी सूत्रांच्या माहितीनुसार ओसामा बिन लादेन कुठे लपला आहे याची माहिती पाकिस्तानी गुप्तचर संस्थेच्या अधिकाऱ्याने दिली. पेंटॅगॉनने मात्र ही कपोलकल्पित गोष्ट रचण्यात आल्याचे सांगितले. पेंटॅगॉनचे प्रवक्ते लेफ्टनंट कर्नल स्टीव्ह वॉरेन यांनी सांगितले की, लादेनवरील कारवाईबाबत नवी माहिती सांगण्यात आली. त्यात अनेक चुका आहेत व त्यात बनावटपणाच अधिक आहे. रिपब्लिकन सिनेटर जॉन मॅकेन यांनी प्रशासनाच्या म्हणण्याचे समर्थन केले आहे. अध्यक्षांनी लादेनच्या कारवाईचा निर्णय घेतला होता, त्यात मोठे यश मिळाले होते. मात्र, त्यांच्या या निर्णयाची स्तुती करण्याचे सोडून भलत्याच कथा पुढे मांडल्या जात आहेत.