वॉशिंग्टन :  भारतीय अमेरिकी धोरणतज्ज्ञ नीरा टंडन यांची व्हाइट हाऊसमध्ये अध्यक्ष जो बायडेन यांचे वरिष्ठ सल्लागार म्हणून नेमणूक करण्यात आली आहे. त्यांनी व्हाइट हाऊसमधील अर्थसंकल्प व्यवस्थापन पदासाठी केलेला अर्ज रिपब्लिकनांच्या तीव्र विरोधामुळे दोन महिन्यांपूर्वी माघारी घेतला होता.

रिपब्लिकनांनी  परवडणारी आरोग्य सेवा कायदा रद्द केला होता, त्याबाबत सर्वोच्च न्यायालयात जे खटले चालतील किंवा जे निकाल येतील त्यावर अध्यक्षांना सल्ला देण्याचे काम नीरा टंडन करणार आहेत. अमेरिकन डिजिटल सेवेचा फेरआढावा त्या घेणार आहेत.

टंडन (वय ५०) या सध्या सेंटर फॉर अमेरिकन प्रोग्रेस या संस्थेच्या अध्यक्ष व मुख्य कार्यकारी अधिकारी आहेत. सोमवारी त्या व्हाइट हाऊसमध्ये काम सुरू करतील.  बायडेन प्रशासनाने म्हटले आहे,की नीरा यांची बुद्धिमत्ता , चिकाटी, राजकारणाची आवड हे गुण महत्त्वाचे आहेत.

यापूर्वीच्या नियुक्त्या

यापूर्वी त्यांनी आरोग्य सल्लागार म्हणून व्हाइट हाऊसमध्ये काम केले आहे. ओबामा—बायडेन प्रशासनातही टंडन यांनी देशांतर्गत धोरण संचालक म्हणून काम केले होते. हिलरी क्लिंटन यांच्या अध्यक्षीय निवडणूक प्रचारातही त्यांनी धोरण संचालक म्हणून काम केले होते.