अमेरिकेतील व्हाइट हाऊसचे प्रसिद्धी अधिकारी शॉन स्पायसर यांनी शुक्रवारी अचानक राजीनामा दिला. व्हाइट हाऊसच्या तीन अधिकाऱ्यांनी या वृत्ताला दुजोरा दिला.

न्यूयॉर्कमधील अर्थपुरवठादार आणि अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या निवडणूक प्रचार मोहिमेत निधी उभारण्याचे काम करणारे अँथनी स्कारामुस्सी यांनी व्हाइट हाऊसचे जनसंपर्क संचालक म्हणून जबाबदारी स्वीकरल्यानंतर स्पायसर यांनी राजीनामा दिला आहे.

अध्यक्ष ट्रम्प यांनी स्पायसर यांना राजीनामा न देण्याची विनंती केली. मात्र स्पायसर यांनी त्यांचे ऐकले नाही व राजीनामा दिला, असे व्हाइट हाऊसमधील सूत्रांनी सांगितले.

दरम्यान, अमेरिकेचे अ‍ॅटर्नी जनरल जेफ सेशन्स यांनी रशियासंबंधी तपासातून बाहेर पडल्याबद्दल ट्रम्प यांनी केलेली टीका धुडकावून लावली. त्यांच्या सहा महिन्यांच्या कार्यकाळानंतर ट्रम्प यांनी ही टीका केली. या काळात ट्रम्प यांनी राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार मायकेल फ्लिन आणि एफबीआयचे संचालक जेम्स कॉमी यांना पदावरून हटवले होते. २०१६ साली ट्रम्प यांच्या अध्यक्षीय निवडणुकीदरम्यान रशियाच्या गुप्तहेर संघटनांनी हस्तक्षेप केल्याचा आरोप होता. त्या प्रकरणाची हे अधिकारी तपासणी करत होते.