वॉशिंग्टन : अमेरिकी अध्यक्ष ट्रम्प यांच्या विरोधातील महाभियोग चौकशीत सहकार्य करण्यास व्हाइट हाऊसने नकार दिला आहे.

अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्याविरोधात युक्रेनप्रकरणी तक्रार दाखल झाल्यानंतर डेमोक्रॅटिक समितीने त्यांची चौकशी सुरू केली होती. अमेरिकेचे माजी उपाध्यक्ष व आगामी निवडणुकीत डेमोक्रॅटिक पक्षाच्या अध्यक्षीय उमेदवारीसाठीचे दावेदार जो बिदेन व त्यांच्या मुलाच्या युक्रेनमधील उद्योग व्यवसायांची चौकशी करण्यासाठी ट्रम्प यांनी युक्रेनच्या अध्यक्षांना फोन करून दबाव आणला होता, त्या प्रकरणी त्यांच्या विरोधात तक्रार आल्यानंतर त्यांची महाभियोग चौकशी सुरू करण्यात आली आहे.

व्हाइट हाऊसने म्हटले आहे की, विरोधक करीत असलेली चौकशी घटनाबा असून लोकशाही प्रक्रियेला त्यामुळे धोका निर्माण झाला आहे. साक्षीदारांची उलट तपासणी घेण्याचा अधिकार ट्रम्प यांना असताना त्यांना तो नाकारण्यात आला असून डेमोक्रॅटिक पक्ष बंद दाराआड चौकशी करीत आहे. चौकशीत कुठलेही सहकार्य केले जाणार नाही अशी भूमिका व्हाइट हाऊ सने पत्रातून प्रतिनिधिगृहाच्या डेमोक्रॅटिक नेत्यांना कळवली आहे. प्रतिनिधिगृह सध्या महाभियोग चालवण्याच्या शक्यतेची चाचपणी करीत असून प्राथमिक चौकशी सुरू आहे. जो बिदेन हे माजी उपाध्यक्ष असून आगामी निवडणुकीत डेमोक्रॅटसचे अध्यक्षीय उमेदवार असण्याची शक्यता आहे. त्यामुळे त्यांची प्रतिमा मलिन करण्यासाठी ट्रम्प यांनी परदेशातून मदत घेण्याचा प्रयत्न केला आहे.

व्हाइट हाऊसचे वकील पॅट सिपोलोन यांनी ट्रम्प यांच्यावरील आरोप फेटाळले असून ते निराधार व घटनाबा असल्याचे म्हटले आहे. डेमोक्रॅटिक पक्षाने सुरू केलेल्या चौकशीत व्हाइट हाऊ स सहभागी होऊ शकत नाही, कारण ही चौकशी पक्षपाती व घटनाबा आहे असे त्यांनी चौकशी समितीला पाठवलेल्या पत्रात म्हटले आहे. अमेरिकी लोकांच्या आशाआकांक्षा पूर्ण करण्यासाठी ट्रम्प हे बांधील असून लोकांसाठी ते काम करीत राहतील. साक्षीदारांची उलटतपासणी, पुरावे पाहण्याची संधी, वकिलाच्या मदतीने बाजू मांडण्याचा अधिकार अशी कुठलीही संधी ट्रम्प यांना देण्यात आली नाही. सभागृहात मतदान न घेताच त्यांच्यावर महाभियोग चौकशी लावण्यात आली अशी  टीका सिपोलोन यांनी केली.

अध्यक्ष ट्रम्प यांच्या विरोधातील महाभियोग चौकशी ही राजकीय स्वरूपाची आहे. अध्यक्षांनी काही चूक केलेली नसून डेमोक्रॅटिक पक्षालाही ते माहिती आहे. केवळ राजकीय हेतूने त्यांनी २०१६ मधील जनमताचा कौल असलेले सरकार धोक्यात आणण्याचा प्रयत्न चालवला आहे. प्रत्येक अमेरिकी व्यक्तीला जे मूलभूत अधिकार असतात तेच डेमोक्रॅटिक पक्षाने पायदळी तुडवले आहेत.

– स्टीफनी ग्रिशॅम, व्हाइट हाऊसच्या प्रसिद्धी सचिव