आधीच इशारा दिल्यानुसार अमेरिकी अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी जागतिक आरोग्य संघटनेची आर्थिक मदत बंद केली आहे. दरवर्षी अमेरिका आरोग्य संघटनेला ५० कोटी डॉलर्सची मदत देत असते, पण यावेळी जागतिक आरोग्य संघटनेने करोनाची साथ गलथानपणे हाताळतानाच चीनकेंद्री भूमिका घेतल्याचा ठपका ठेवून ही मदत बंद करण्याचा निर्णय  ट्रम्प प्रशासनाने सर्व परिस्थितीचा आढावा घेऊन जाहीर केला आहे.

करोनाची साथ पसरवण्याच्या व त्यातील माहिती दडवण्याच्या चीनच्या कृत्यांवर जागतिक आरोग्य संघटनेने पांघरूण घातले असा आरोप अमेरिकेने केला आहे. आतापर्यंत कोविड-१९ साथीत जगात १,१९,००० बळी गेले असून अमेरिकेत पंचवीस हजाराहून अधिक लोक मृत्युमुखी पडले आहेत. दरम्यान अमेरिकेच्या या निर्णयावर चीनने तीव्र चिंता व्यक्त केली असून जागतिक आरोग्य संघटनेला चीनकडून दिलेल्या मदतीत वाढ करण्याचे संकेत दिले आहेत.

चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते झाओ लिजियान यांनी सांगितले की, चीनने करोनाविरोधात लढण्यासाठी जागतिक आरोग्य संघटनेला आधीच २ कोटी डॉलर्स दिले आहेत.

ट्रम्प यांनी मंगळवारी व्हाइट हाऊसच्या पत्रकार परिषदेत सांगितले की, जागतिक आरोग्य संघटनेची मदत बंद करण्याचा आदेश आपण प्रशासनास दिला असून जागतिक आरोग्य संघटनेने कोविड १९ म्हणजे करोनाची साथ कशी हाताळली याचा आढावा घेतला असता त्यात त्यांचा गलथानपणा उघड झाला आहे.

जागतिक आरोग्य संघटनेने चीनला कसे पाठीशी घातले हे आता सर्वानाच माहिती आहे. चीनमधून प्रसारित झालेल्या करोना विषाणूमुळे अमेरिकेची अर्थव्यवस्था डबघाईस आली, असा आरोप ट्रम्प व इतर वरिष्ठ अधिकाऱ्यांनी केला आहे.

संयुक्त राष्ट्रांचे सरचिटणीस अँतोनियो गट्रेस यांनी सांगितले की, जागतिक आरोग्य संघटनेची मदत बंद करण्यास अत्यंत चुकीची वेळ निवडण्यात आली आहे.

ट्रम्प यांनी सांगितले की, अमेरिकी करदात्यांच्या पैशातील ४० ते ५० कोटी डॉलर्स हे जागतिक आरोग्य संघटनेला मदतीपोटी दिले जात होते पण चीन मात्र वर्षांला ४ कोटी किंवा त्याहून कमी डॉलर्स आरोग्य संघटनेला देत होता. जागतिक आरोग्य संघटनेने अमेरिकेला हवाई वाहतूक निर्बंध लादण्यापासून परावृत्त केले त्यामुळे विषाणू अमेरिकेत पसरला, पण नंतर आम्ही परदेशातून येणारी विमाने बंद केली. त्यामुळे अनेक लोकांचे प्राण वाचण्यास मदत झाली. अमेरिकेत कोविड १९ विषाणूचा प्रसार व त्यानंतर तेथील अर्थव्यवस्था कोसळण्यास जागतिक आरोग्य संघटना जबाबदार आहे. जागतिक आरोग्य संघटनेने करोनाची साथ हा सार्वजनिक आरोग्यास मोठा धोका आहे हे जाहीर करण्यास विलंब केला.

चीनमध्ये करोनावर वैज्ञानिक, संशोधन करणारे लोक व डॉक्टर्स यांना गायब करण्याचे चीनचे पाप जागतिक आरोग्य संघटनेने पाठीशी घातले. अमेरिकी तज्ञांना चीनमध्ये संशोधनासाठी जाण्यापासून आडकाठी केली.

आरोग्य संघटना चीनच्या  माहितीवर विसंबून राहिल्याने जगात करोनाची साथ वीस पटींनी अधिक फैलावली असा आरोप ट्रम्प यांनी केला आहे.