करोनाची लस बनवण्यासाठी देशांमध्ये सुरु असणाऱ्या स्पर्धेमुळे करोना साथीचा धोका आणखीन वाढू शकतो अशी भीती जागतिक आरोग्य संघटनेचे (डब्यूएचओ) प्रमुख ट्रेडोस अधानन घेब्रेसस (Tedros Adhanon Ghebreyesus) यांनी व्यक्त केली आहे. घेब्रेसस यांनी मंगळवारी जगभरामध्ये सध्या वेगवगेळ्या देशांमध्ये लस बनवण्याची जी स्पर्धा सुरु आहे त्याऐवजी सर्व देशांनी एकत्र येऊन करोनाची साथ संपवण्यासाठी काम करावं असं आवाहन केलं आहे. यासंदर्भातील वृत्त रॉयटर्सने दिलं आहे.

विकसनशील देशांबरोबर करोनासंदर्भातील संशोधनाची माहिती शेअर करण्यासंदर्भात डब्यूएचओने ३१ ऑगस्टपर्यंतची मुदत दिली आहे. “कोवॅक्स ग्लोबल व्हॅकसीन फॅसेलीटी” या कार्यक्रमाअंतर्गत विकसित आणि श्रीमंत देशांनी त्यांच्याकडील करोना लसीसंदर्भातील माहितीबद्दल विकसनशील देशांबरोबर चर्चा करावी असं डब्यूएचओने म्हटलं आहे. डब्यूएचओचे सदस्य असणाऱ्या सर्व १९४ देशांना आपण या कार्यक्रमामध्ये सहभागी ्व्हावे अशी विनंती करणारं पत्र पाठवलं असल्याची माहिती घेब्रेसस यांनी दिली.  तरुणांमध्ये करोना संसर्गाचे प्रमाण वाढत असल्याबद्दल डब्यूएचओने चिंता व्यक्त केली आहे. तरुणांना करोनाचा संसर्ग झाल्याचे समजत नसल्याने त्यांच्या माध्यमातून वयस्कर व्यक्तींना संसर्ग होण्याचा धोका वाढला असल्याचे डब्यूएचओने म्हटलं आहे.

युरोपीयन युनियन, ब्रिटन, स्वित्झर्लंड आणि अमेरिकेने करोना लसीसंदर्भात बड्या कंपन्यांबरोबर करार करण्याची तयारी सुरु केल्यानेच कोवॅक्ससाठी घ्रेब्रेसस यांनी पुढाकार घेतल्याचे समजते. रशिया आणि चीनही करोनाची लस निर्माण करण्यासंदर्भातील प्रयत्न सुरु आहेत. मात्र लस निर्माण झाल्यानंतर देशाला प्राधान्य दिल्याने जागतिक स्तरावर या आजाराविरोधात लढण्याच्या मोहिमेला फटका बसू शकतो अशी भीती डब्यूएचओला आहे. “लसीसंदर्भातील राष्ट्रवाद थांबवला पाहिजे. जगभरामध्ये लस पुरवणे हे प्रत्येक देशाच्या हितासाठी फायद्याचे ठरणार आहे,” असं घेब्रेसस यांनी म्हटलं आहे. युरोपियन कमिशननेही युरोपीयन युनियनमधील सदस्य राष्ट्रांना डब्लूएचओच्या कार्यक्रमात सहभागी होण्याचं आवाहन केलं आहे. लसीची किंमत आणि ती बनवण्यासाठी लागणारा वेळ या दोन महत्वाच्या गोष्टींचा विचार करता सर्वांना एकत्र काम करणं गरजेचं असल्याचे युरोपियन कमिशनने म्हटलं आहे. करोनामुळे जगभरामध्ये ७ लाख ७० हजारांहून अधिक जणांचा मृत्यू झाला आहे.

आतापर्यंत कोवॅक्स कार्यक्रमासाठी आर्थिक दृष्ट्या सक्षम नसणाऱ्या ९२ देशांनी होकार दर्शवला आहे. तर ८० श्रीमंत देशांनाही या कार्यक्रमामध्ये सहभागी होण्यासंदर्भात सकारात्मक प्रतिसाद दिला असून जागतिक स्तरावर आर्थिक पाठबळ उभं करुन सर्वांना मदत करण्याची तयारी दर्शवली असल्याचे डब्लूएचओने म्हटलं आहे. असं असलं तरी अद्यापही काही देश ३१ ऑगस्टच्या डेड लाइनची वाट पाहत आहेत. लसीची निर्मिती करुन ती जगभरामध्ये पोहचवण्यासाठी सर्वच राष्ट्रांनी सहकार्य केल्यास त्याचा फायदा होणार असल्याचे डब्लूएचओचे म्हणणे आहे.

डब्लूएचओच्यावतीने जागतिक स्तरावरील करारासंदर्भातील कामांचे नेतृत्व करणाऱ्या ब्रुस एल्वार्ड यांनी या कार्यक्रमामध्ये सहभागी होण्यासाठी आम्ही कोणावरही दबाव आणत नाहीय असं सांगितलं आहे. सर्व देशांनी एकत्र काम केल्यास या लसीसंदर्भातील किंमत, वेळ आणि देशांमध्ये असणारी गरज या महत्वाच्या मुद्द्यांवर सहजपणे तोडगा काढता येईल असा विश्वास एल्वार्ड यांनी व्यक्त केला.

१५० हून अधिक देशांमध्ये करोना लसीसंदर्भात काम सुरु असून त्यापैकी दोन डझन प्रयोग हे मानवी अभ्यासापर्यंत पोहचले आहेत. तर शेवटच्या टप्प्यात पोहचलेल्या प्रयोगांची संख्या अगदीच मोजकी आहे. एकीकडे डब्ल्यूएचओ सर्व देशांना एकत्र आणण्याचा प्रयत्न करत असतानाच काही देश एकमेकांबरोबर करार करुन या कोवॅक्स कार्यक्रमामध्ये अडथळा निर्माण करत असल्याचेही डब्यल्यूएचओने म्हटलं आहे.