News Flash

“करोनाचं दुसरं वर्ष पहिल्यापेक्षा भयानक असेल”, जागतिक आरोग्य संघटनेनं दिला इशारा!

जागतिक आरोग्य संघटनेचे अध्यक्ष डॉ. टेड्रॉस यांनी करोनाच्या संकटाविषयी आपली भूमिका मांडली आहे.

गेल्या वर्षभरात जगभरात करोनानं कहर माजवल्यानंतर आता कुठे जगातल्या काही देशांमध्ये परिस्थिती सामान्य होण्याच्या दिशेने सुरुवात झाली आहे. भारतासारख्या काही देशांमध्ये करोनाच्या दुसऱ्या लाटेचा जबरदस्त तडाखा बसला आहे. जगभरात करोनावर संशोधित झालेल्या लसींमुळे आख्ख्या जगानं करोनाशी दोन हात करण्याची तयारी सुरू केली आहे. पण या सगळ्या पार्श्वभूमीवर जागतिक आरोग्य संघटनेनं मात्र वेगळाच इशारा दिला आहे. “कोविड-१९नं आत्तापर्यंत जगभरात ३३ लाखाहून जास्त जीव घेतले आहेत. आपण आता करोनाच्या दुसऱ्या वर्षात आहोत. पण हे दुसरं वर्ष पहिल्या वर्षापेक्षा अधिक भयानक असेल. सार्वजनिक आरोग्य व्यवस्था आणि लसीकरण या दोन्हींच्या एकत्रित मदतीनेच आपण यातून बाहेर पडू शकू”, असा इशारा जागतिक आरोग्य संघटनेचे अध्यक्ष डॉ. टेड्रॉस यांनी दिला आहे.

लसीचा पुरवठा हे प्रमुख आव्हान!

जगभरातल्या करोनाच्या संकटाबाबत डॉ. टेड्रॉस यांनी आज माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी जगभरातल्या करोनाच्या परिस्थितीसोबतच चालू वर्षात करोनाचा नि:पात करण्यासाठी कशा पद्धतीने पावलं उचलणं गरजेचं आहे, याविषयी जागतिक आरोग्य संघटनेची भूमिका मांडली. “या काळामध्ये लसीचा पुरवठा हे एक सर्वात महत्त्वाचं आव्हान आहे. मात्र, जगातील काही प्रमुख लस उत्पादक देश यासंदर्भात इतर देशांना मदतीचं धोरण अंगीकारत असल्याचं पाहून मला आनंद होत आहे. काही देशांनी लसींचा साठा इतर देशांना पुरवण्यासाठी पुढाकार घेतला आहे. तसेच काही लस उत्पादक कंपन्यांनी लसीचा फॉर्म्युला देण्याचीही तयारी दर्शवली आहे”, असं ते म्हणाले.

 

भारतातील परिस्थिती चिंतेचा विषय!

दरम्यान, यावेळी डॉ. टेड्रॉस यांनी भारतातील परिस्थिती चिंतेचा विषय असल्याची भूमिका मांडली. त्यासोबतच इतरही काही देशांमधील परिस्थितीवर भाष्य केलं. “भारतातील परिस्थिती अजूनही चिंतेचा विषय आहे. अनेक राज्यांमध्ये करोनाच्या रुग्णसंख्येत मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. मृतांचे आकडे वाढत आहेत. WHO नं भारताला मदतीचा हात दिला असून आत्तापर्यंत १ हजार ऑक्सिजन सिलेंडर, तात्पुरत्या आरोग्य सेवांसाठी टेंट, मास्क आणि इतर वैद्यकीय गरजेच्या वस्तू पुरवल्या जात आहेत”, असं टेड्रॉस म्हणाले. “मात्र, तातडीने मदतीची गरज असलेला भारत हा एकमेव देश नाही. नेपाळ, श्रीलंका, व्हिएतनाम, कंबोडिया, थायलंड आणि इजिप्तमध्ये देखील करोनाच्या रुग्णसंख्येत वाढ नोंदवण्यात आली आहे. WHO या सगळ्यांना शक्य ती सर्व मदत देईल”, असं टेड्रॉस यांनी यावेळी सांगितलं.

 

Next Stories
1 केरळमध्ये मान्सून वेळेआधी हजेरी लावणार; हवामान खात्याचा अंदाज
2 लसीच्या दोन डोसमधलं अंतर वाढवल्याने कोणताही नकारात्मक परिणाम नाही – डॉ. फौची
3 Corona: केरळमध्ये लॉकडाउन पुन्हा वाढवला; आता राज्यात २३ मे पर्यंत निर्बंध
Just Now!
X