भारताने लस वितरण मोहिमेअंतर्गत ६० पेक्षा अधिक देशांमध्ये लस पोहचवण्याचे निश्चित केले आहे. नेपाळ, बांग्लादेश, भूतान आणि इतर शेजारी देशच नाही तर भारत सरकारने पश्चिम आशिया, आफ्रिका आणि लॅटिन अमेरिकेसह पश्चिमेकडील देशांनाही लस पाठविली आहे.

भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मार्गदर्शनाखाली कोविड -१९ या जागतिक महामारीवर मात करण्यासाठी पावले उचलली आहेत. या अंतर्गत छोट्या देशांना मदत करण्याच्या प्रतिज्ञेचा एक भाग म्हणून ‘लस मैत्री’ उपक्रमांतर्गत इतर देशांना विनाशुल्क लस पुरवण्यास सुरूवात केली आहे.

जागतिक आरोग्य संघटनेचे महासंचालक टेड्रॉस अधानॉम घेबेरियसस यांनी गुरुवारी भारत आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे छोट्या देशांना मदत करण्यासाठी आणि लस समानतेला समर्थन देण्यासाठी आभार मानले. त्यांनी अशी आशा व्यक्त केली की, इतर देशांनीही भारताच्या अनुसरण केले पाहिजे.

आपल्याा ट्विटर संदेशात ते म्हणाले, “लस समानतेला पाठिंबा दर्शविल्याबद्दल भारत आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आभार. तुमची कोवॅक्स आणि कोविड -१९ वरील लस लोकांपर्यंत पोहोचवण्याच्या वचनबद्धतेमुळे ६० पेक्षा अधिक देशांना त्यांचे आरोग्य कर्मचारी आणि इतर प्राधान्य गटांना लसी देण्यास मदत होत आहे. मला आशा आहे की इतर देश आपल्या उदाहरणाचे अनुसरण करतील ”

भारताने विविध देशांना आतापर्यंत लसीचे ३६१ लाखांहून अधिक डोस पाठविले असल्याचं परराष्ट्र मंत्रालयाने गुरुवारी सांगितले. त्यापैकी ६७.५ लाख डोस अनुदान सहाय्य म्हणून तर २९४.४४ लाख डोस व्यावसायिक तत्वावर ग्राहकांना देण्यात आले आहेत.पीटीआयच्या अहवालानुसार, परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते अनुराग श्रीवास्तव म्हणाले की, देशांना लसींचा पुरवठा येत्या आठवड्यात आणि काही महिन्यांत टप्प्याटप्प्याने सुरू राहील. परंतु राष्ट्रीय लसीकरण कार्यक्रमासाठी देशांतर्गत गरजा लक्षात घेणे महत्वाचे आहे.