News Flash

“…आणि जग या परीक्षेत पराभूत होतंय”, WHO नं दिला इशारा!

करोनाच्या संकटकाळात लस मुबलक असणाऱ्या देशांनी इतर देशांना लसपुरवठा करण्याचं आवाहन WHO नं केलं आहे.

जागतिक आरोग्य संघटनेचा जगाला इशारा!

दीड वर्षाहून जास्त काळ करोनाशी सुरू असलेला जगाचा लढा आणि वेगवेगळ्या देशांमध्ये दिल्या जाणाऱ्या करोनाच्या लसी या पार्श्वभूमीवर जगभरातल्या नागरिकांना आता सारंकाही आलबेल होणार असून अनेक ठिकाणी नागरिक पुन्हा पूर्वीप्रमाणेच फिरू देखील लागले आहेत. मात्र, या पार्श्वभूमीवर जागतिक आरोग्य संघटना अर्थात World Health Organisation ने इशारा दिला आहे. करोनाविरोधात सुरू असलेला आपला लढा ही परीक्षा आहे, पण आपण त्या परीक्षेत पराभूत होत आहोत, असा इशारा WHO चे प्रमुख डॉ. टेड्रॉस यांनी दिला आहे. आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीच्या बैठकीसमोर बोलताना टेड्रॉस यांनी जगभरातील करोनाच्या परिस्थितीवर भाष्य केलं आहे.

जगात दोन प्रकारच्या करोना साथी!

डॉ. टेड्रॉस यांनी यावेळी जागतिक स्तरावर करोना लसीच्या वाटपातील असमानतेमुळे निर्माण झालेल्या परिस्थितीवर टिप्पणी केली आहे. “करोनाची लस इतर देशांना देणे, चाचणी आणि उपचार करणे यामध्ये येणाऱ्या अपयशामुळे जगात करोनाच्या दोन साथी तयार झाल्या आहेत. एक साथ अशा देशांमध्ये आहे, जिथे लस, औषधे असे उपचार मोठ्या प्रमाणावर उपलब्ध असून त्या आधारावर या देशांमध्ये अनलॉकची प्रक्रिया सुरू झाली आहे. दुसरी लाट अशा देशांमध्ये आहे, जिथे लस, औषधोपचार यांचा तुटवडा असल्यामुळे हे देश करोना विषाणूचा फैलाव रोखण्यासाठी पुन्हा लॉकडाउनचा मार्ग स्वीकारत आहेत”, असं ते म्हणाले.

जितका काळ हे संकट राहील, तेवढी समाजात…

यावेळी बोलताना डॉ. टेड्रॉस यांनी करोना संकटाच्या दूरगामी परिणामांविषयी चिंता व्यक्त केली आहे. “जितका जास्त काळ करोनाचं संकट जगात राहील, तेवढी समाजात सामाजिक आणि आर्थिक उलथापालथ पाहायला मिळेल. ही साथ म्हणजे एक परीक्षा आहे आणि या परीक्षेत जग पराभूत होत आहे”, अशा शब्दांत त्यांनी आपली चिंता व्यक्त केली आहे. दरम्यान, जगातील ज्या राष्ट्रांकडे करोनाची लस मुबलक प्रमाणात आहे, त्यांनी इतर कमतरता असणाऱ्या देशांना ही लस देण्याची आवश्यकता आहे. करोना लसीच्या वाटपामध्ये समानता येणं आवश्यक आहे, असं देखील त्यांनी नमूद केलं आहे.

Delta Variant चा फैलाव १२४ देशांमध्ये

दरम्यान, करोनाच्या डेल्टा व्हेरियंटचा फैलाव जगभरातल्या १२४ देशांमध्ये झाला असल्याची माहिती यावेळी टेड्रॉस यांनी दिली आहे. “हा व्हेरिएंट लवकरच इतर प्रकारांपेक्षा अधिक धोकादायक होईल. येत्या काही महिन्यांमध्येच हे चित्र आपल्याला पाहायला मिळेल”, असं टेड्रॉस यांनी स्पष्ट केलं आहे.

करोनाची तिसरी लाट कधी येणार? WHO च्या प्रमुखांनी दिलं उत्तर; म्हणाले, “दुर्दैवाने…”

काय सांगते आकडेवारी?

करोनाचे डेल्टा व्हेरिएंटव्यतिरिक्त आत्तापर्यंत तीन प्रमुख Variant of Concern अर्थात VoC आढळून आले आहेत. त्यामध्ये अल्फा व्हेरिएंट सर्वात आधी ब्रिटनमध्ये आढळून आला होता. त्यानंतर त्याचा तब्बल १८० देशांमध्ये फैलाव झाला. गेल्या आठवड्याभरात ६ देशांची भर पडली आहे. बीटा व्हेरिएंट सर्वप्रथम दक्षिण आफ्रिकेमध्ये आढळून आला होता. त्याचा जगभरातल्या १३० देशांमध्ये आत्तापर्यंत फैलाव झाला आहे. यातले शेवटचे ७ देशांमध्ये गेल्या आठवड्याभरात फैलाव झाला आहे. तर गामा व्हेरिएंट सर्वात आधी ब्राझीलमध्ये आढळून आला होता. त्याचा ७८ देशांमध्ये फैलाव झाला आहे. गेल्या आठवड्याभरात शेवटच्या तीन देशांमध्ये त्याचे रुग्ण आढळून आले आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 21, 2021 7:42 pm

Web Title: who chief warns about corona pandemic and its impact on future globally pmw 88
Next Stories
1 जुळ्या बहिणींची गोळ्या घालून हत्या; इनस्टाग्रामवर केला लाईव्ह व्हिडीओ
2 लडाखनंतर आता चीनची नजर उत्तराखंडच्या सीमेवर?; भारताकडून ५० हजार अतिरिक्त सैनिक तैनात
3 “CAA, NRC चा हिंदू-मुस्लिमांमध्ये फूट पडण्याशी काहीही संबंध नाही”, मोहन भागवत यांनी मांडली भूमिका
Just Now!
X