जीनिव्हा/बीजिंग : चीनमध्ये करोना विषाणूच्या उद्रेकाने २१३ जणांचा झालेला मृत्यू आणि हजारोंना त्याचा संसर्ग झाल्याच्या पार्श्वभूमीवर जागतिक आरोग्य संघटनेने (डब्ल्यूएचओ) शुक्रवारी ‘जागतिक आरोग्य आणीबाणी’ जाहीर केली.

आरोग्य यंत्रणा कमकुवत असलेल्या देशांमध्ये करोना विषाणू मोठय़ा प्रमाणावर पसरण्याची शक्यता आणि जागतिक आरोग्याचा प्रश्न लक्षात घेऊन जागतिक आरोग्य आणीबाणी जाहीर करण्यात आल्याची जागतिक आरोग्य संघटनेचे प्रमुख ट्रेडॉस अधानॉम घेब्रेयेसस यांनी सांगितले.

आपण सर्वानी करोना विषाणूच्या फैलावास प्रतिबंध करण्यासाठी एकत्रितरीत्या प्रयत्न करण्याची आवश्यकता असल्याचे ट्रेडॉस यांनी स्पष्ट केले. त्यांनी याच आठवडय़ात चीनला भेट देऊन चीनचे अध्यक्ष क्षी जिनपिंग यांची भेट घेतली होती. आंतरराष्ट्रीय व्यापार वा प्रवासावर निर्बंध आणण्याचे प्रयोजन नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले होते.

जागतिक आरोग्य आणीबाणीच्या काळात प्रवासी किंवा वस्तूवाहतुकीवर निर्बंध आणणे परिणामशून्य ठरू शकते, असे सिद्ध झाल्याचे जागतिक आरोग्य संघटनेच्या आणीबाणी समितीनेही स्पष्ट केले. आंतरराष्ट्रीय वाहतुकीवर निर्बंध आणल्यास मदतकार्यात अडथळे येतात, उद्योगावर परिणाम होतो आणि देशांच्या अर्थव्यवस्थेवर त्याचा नकारात्मक परिणाम होत असल्याचेही या समितीने म्हटले आहे.

आफ्रिकेत स्वाइन फ्लू, पोलिओ, झिका आणि इबोलाचा दोनदा उद्रेक झाल्यानंतर ‘डब्ल्यूएचओ’ने यापूर्वी पाच वेळा आरोग्य आणीबाणी जाहीर केली होती.

चीनमधील बळी २१३ वर

बीजिंग : चीनमध्ये करोना विषाणूने घेतलेल्या बळींची संख्या २१३ झाली आहे. संसर्ग झालेल्या रुग्णांची एकूण संख्या ही ९६९२ झाली आहे. हुबेई प्रांतात ४३ रुग्णांचा मृत्यू झाल्याचे शुक्रवारी जाहीर करण्यात आले. हुबेई प्रांतातच रुग्णांची संख्या अधिक असून १९८२ नवीन रुग्ण सापडले आहेत. त्यामुळे एकूण रुग्णांची संख्या ९६९२ झाली आहे. भारत, ब्रिटन, अमेरिका, दक्षिण कोरिया, जपान व फ्रान्स यांसह एकूण वीस देशांत करोना विषाणूचे रुग्ण सापडले आहेत.

केरळात १०५३ संशयित रुग्ण

कोची : चीनमधील वुहान येथून केरळात परतलेल्या एका विद्यार्थ्यांस करोना विषाणूची लागण झाल्याचे स्पष्ट झाल्यानंतर आता केरळमध्ये एकूण १०५३ लोकांना विषाणूचा संसर्ग असल्याच्या संशयावरून देखरेखीखाली ठेवण्यात आले आहे. ज्या विद्यार्थ्यांला लागण झाली आहे त्याला त्रिचूर येथील रुग्णालयात हलवले आहे.

१८ देशांत खबरदारी

’ डब्ल्यूएचओच्या माहितीनुसार चीनव्यतिरिक्त १८ देशांत ८२ जणांना करोनाची लागण.

’ प्रवासी आणि वस्तूवाहतुकीवर निर्बंध घालणार नसल्याची डब्ल्यूएचओची माहिती.

’ चीनला जाणे टाळण्याचे अनेक देशांचे आपल्या नागरिकांना आवाहन.

’ चीनच्या वुहान प्रांतातून येणाऱ्या प्रवाशांवर काही देशांची बंदी.

’ चीनला लागून असलेली पूर्वसीमा रशियाकडून बंद.

महाराष्ट्रात १२ रुग्णांत लक्षणे 

मुंबई : मुंबईत दाखल झालेल्या दोन परदेशी महिलांमध्ये करोनाचा संसर्ग झाल्याची संभाव्य लक्षणे आढळली आहेत. गुरुवारी त्यांना कस्तुरबा रुग्णालयात निरीक्षणाखाली ठेवले आहे. नागपूरमध्ये एक संशयित रुग्ण आढळला असून राज्यात सध्या १२ संशयित रुग्ण रुग्णालयात दाखल आहेत.

‘निपा’विरोधातील  उपाययोजनांच्या धर्तीवर पावले

थ्रिसूर : करोनाची लागण झालेली व्यक्ती सर्वप्रथम केरळच्या थ्रिसूर जिल्ह्य़ामध्ये आढळल्याने आरोग्य अधिकाऱ्यांनी २०१८ मध्ये निपा या प्राणघातक विषाणूचा फैलाव रोखण्यासाठी केलेल्या परिणामकारक उपाययोजनांच्या धर्तीवर पावले उचलण्याचे ठरविले आहे. शुक्रवारी आरोग्य विभागाला वुहानमधून परतलेल्या एका २० वर्षीय विद्यार्थिनीमध्ये ५१ टक्के प्राथमिक स्वरूपाचे आणि ४५ टक्के दुय्यम स्वरूपाचे करोनाचे घटक आढळले आहेत.