जगातील सातवे आश्चर्य मानला जाणारा ताजमहाल कुणाच्या मालकीचा आहे, असा खडा सवाल एआयएमआयएम पक्षाचे खासदार असाउद्दीन ओवैसी यांनी सांस्कृतिकमंत्री महेश शर्मा यांना विचारला. संग्रहालयाबाबत पुरवणी प्रश्नांना उत्तरे देत असताना त्यांनी हा प्रश्न उपस्थित केला.
समाजवादी पक्षाचे नेते धर्मेद्र यादव यांनी प्रथम पुरवणी प्रश्न विचारला होता त्यावर यादव यांच्या पुढे बसलेल्या ओवैसी यांनी ‘ताजमहाल कुणाच्या मालकीचा आहे’ अशी विचारणा केली. मंत्र्यांनी त्यांच्या या प्रश्नाकडे दोनदा दुर्लक्ष करून पुरवणी प्रश्नांना उत्तरे चालूच ठेवली. उत्तर प्रदेशच्या नागरी विकास व अल्पसंख्याक मंत्री व समाजवादी पक्षाचे नेत आझम खान यांनी अलिकडेच असे वक्तव्य केले होते, की ताजमहाल हा राज्याच्या वक्फ मंडळाची संपत्ती जाहीर करावा. खान हे वक्फमंत्री असून त्यांनी १३ नोव्हेंबरला ताजमहाल वक्फ मंडळाची मालमत्ता करून त्यांना त्याची सूत्रे देण्याची मागणी केली होती. लखनौ येथील मुस्लीम नेत्यांशी एका बैठकीत बोलताना त्यांनी वक्फ मंडळाच्या सदस्यांसमोर हे विधान केले होते.
शर्मा यांनी संसदेत त्यांच्या उत्तरात सांगितले, की राज्ये व केंद्र शासित प्रदेशांना ऐतिहासिक व सांस्कृतिक महत्त्वाच्या कागदपत्रांचे जतन करण्यासाठी आर्थिक मदत करण्याचे प्रस्ताव नॅशनल अर्काइव्हज ऑफ इंडिया या संस्थेला मिळाले आहेत. नॅशनल मिशन फॉर मॅन्युस्क्रीप्ट या संस्थेने कागदपत्रे व इतर साहित्याच्या संवर्धनासाठी निधी दिला आहे.