सर्वोच्च न्यायालयाने आज राफेल करारातील पुराव्याच्या कागदपत्रांवर केंद्र सरकारने घेतलेला आक्षेप फेटाळून लावत मोदी सरकारला झटका दिला. सर्वोच्च न्यायालयाच्या या निर्णयावर सरकारची बाजू मांडण्यासाठी संरक्षण मंत्री निर्मला सीतारमन यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्यावर हल्लाबोल केला.

अनिल अंबानी यांनी पंतप्रधान मोदींना पैसे दिले असे कोर्टाने म्हटल्याचे काँग्रेस अध्यक्ष म्हणाले. हे साफ खोटे असून हा न्यायालयाचा अवमान आहे. न्यायालयाने असे काहीही म्हटलेले नाही. राहुल गांधी यांनी ज्या गोष्टी सांगितल्या त्या कोर्टाने म्हटलेल्या नाहीत असे निर्मला सीतारमन म्हणाल्या. राहुल गांधींनी जो दावा केला ते कोर्टाने कुठे म्हटले आहे. पण आज त्यांनी जे केले तो कोर्टाची अवमान आहे.

न्यायालयाच्या निकालाचा चुकीचा अर्थ लावण्याचा अधिकार राहुल गांधींना कोणी दिला? असा सवाल निर्मला सीतारमन यांनी विचारला. सर्वोच्च न्यायालयाने आज राफेल प्रकरणात सुनावणी करताना चोरलेली कागदपत्रे पुरावे म्हणून स्वीकारली व केंद्राचा त्यावरील आक्षेप फेटाळून लावला.

काँग्रेस अध्यक्षांनी अर्धा पॅराग्राफही वाचला नसेल हे आपल्या सर्वांना माहित आहे. ‘चौकीदार चोर हैं’ हे वाक्य कोर्टाच्या तोंडी घालणे हा सुद्धा अवमान आहे. सरकारने कॅगला माहिती दिली नाही व निकालामध्ये दुरुस्ती करायला सांगितली हा काँग्रेसचा आरोपही फेटाळून लावला. त्यावेळी कॅगच्या अहवालाची तयारी सुरु होती. दुरुस्तीसाठी आम्ही स्वत:हूनच सर्वोच्च न्यायालयात गेलो. आम्ही नाही तर काँग्रेसने देशाची दिशाभूल केली असे सीतारमन म्हणाल्या.

राष्ट्रीय सुरक्षा आणि संरक्षणाशी संबंधित निवडक आणि अर्धवट चित्र दाखवण्याच्या उद्देशाने याचिकाकर्ते कागदपत्रांचा वापर करत आहेत असा दावा संरक्षण मंत्रालयाने केला आहे.