कोनराड संगमा मेघालयचे नवे मुख्यमंत्री होतील. त्यांनी मागील दहा वर्षांपासून मुख्यमंत्री असलेल्या काँग्रेसच्या मुकूल संगमा सरकारला सत्तेपासून दूर ठेवले आहे. भाजपाने मित्रपक्षांची जमवाजमव करत काँग्रेसला सत्तेपासून दूर ठेवले आहे. ४० वर्षीय कोनराड संगमा यांची कौटुंबिक पार्श्वभूमी राजकीय आहे. कोनराड यांचे वडील दिवंगत पी ए संगमा हे लोकसभेचे माजी अध्यक्ष होते. त्यांची बहीण अगाथा संगमा याही राजकारणात सक्रीय आहेत. कोनराड सध्या मेघालयमधील तुरा लोकसभा मतदारसंघाचे प्रतिनिधीत्व करतात. यापूर्वी या मतदारसंघाचे नेतृत्व अगाथा करत असत. कोनराड संगमा मेघालचे मुख्यमंत्री झाले तर घटनेप्रमाणे त्यांना सहा महिन्याच्या आत विधानसभेवर निवडून यावे लागेल. त्यांना पुन्हा एकदा निवडणूक लढवावी लागेल. नॅशनल पीपल्स पार्टीच्या (एनपीपी) नेतृत्वाखाली मेघालयमध्ये पुढील सरकार स्थापन होईल. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार कोनराड हे मंगळवारी सकाळी १०.३० वाजता शपथ घेतील. विद्यमान सरकारचा कार्यकाळ ७ मार्च रोजी संपणार आहे. कोनराडा संगमा हे मेघालयचे बारावे मुख्यमंत्री होतील. यापूर्वी आठव्या विधानसभेत ते विरोधी पक्षनेते होते. सन २००८ मध्ये मेघालयचे सर्वांत युवा अर्थमंत्री म्हणून कोनराड यांची ओळख आहे.

मेघालयचे माजी मुख्यमंत्री आणि लोकसभाध्यक्ष राहिलेले पी ए संगमा यांचे कोनराड हे सुपूत्र. त्यांचा जन्म २७ जानेवारी १९७८ मध्ये वेस्ट गारो हिल्स जिल्ह्यात झाला होता. शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी आपल्या वडिलांच्या प्रचाराची धुरा हातात घेत राजकारणात पहिले पाऊल टाकले. सन २००८ मध्ये ते पहिल्यांदा आमदार म्हणून निवडून आले. त्यावेळी त्यांनी अनेक महत्वाची खाती सांभाळली. ते सर्वांत युवा अर्थमंत्री राहिले. इतकंच नव्हे तर दहा दिवसांच्या आत मेघालय सरकारचा अर्थसंकल्पही सादर केला होता.

सन २००९ ते २०१३ पर्यंत कोनराड संगमा हे मेघालय विधानसभेचे विरोधी पक्षनेते होते. सध्या ते वडील पी ए संगमाच्या निधनानंतर त्यांच्या तुरा या लोकसभा मतदारसंघाचे प्रतिनिधीत्व करतात. वडीलांनंतर संगमा भाऊ-बहीण दोघेही राजकारणात आले आणि यशस्वीही झाले. बहीण अगाथा याही लोकसभेवर निवडून गेलेल्या आहेत. त्याही केंद्रात मंत्री होत्या. तर भाऊ जेम्स संगमा हेही विधानसभा सदस्य आहेत.

राजकारणात चांगली कामगिरी करणारे कोनराड शिक्षणातही अग्रेसर राहिले. दिल्लीतील सेंट कोलंबस शाळेतून त्यांनी सुरूवातीचे शिक्षण घेतल्यानंतर लंडन विद्यापीठ आणि पेन्सिल्वेनिया येथून उच्च शिक्षण पूर्ण केले आहे. कोनराड हे सामाजिक कार्यातही पुढे असतात. त्यांनी वडील पी ए संगमा यांच्या नावाने फाउंडेशनही सुरू केले आहे. या संस्थेमार्फत मेघालयच्या ग्रामीण भागात शाळा आणि महाविद्यालये चालवली जातात. पर्यावरणावरही ते काम करतात. त्याचबरोबर मेघालय क्रिकेट असोसिएशनचे ते अध्यक्षही आहेत.