योगगुरु रामदेव बाबा यांनी अॅलोपॅथी उपचार पद्धतीबद्दल केलेल्या वादग्रस्त विधानाच्या विरोधात आता डॉक्टर चांगलेच आक्रमक झाले आहेत. रामदेव बाबा यांनी डॉक्टरांची जाहीर माफी मागावी अशी मागणीही डॉक्टरांच्या विविध संघटनांनी केली आहे. तर निवासी डॉक्टरांच्या एका संघटनेने रामदेव बाबा यांचा निषेध करत आंदोलन केलं आहे. देशभरातल्या डॉक्टरांनी आज काळा दिवस पाळत रामदेव बाबा यांच्या अटकेची मागणी केली आहे.

फेडरेशन ऑफ रेसिडेंट डॉक्टर्स असोसिएशन (FORDA) या डॉक्टरांच्या संघटनेने रामदेव बाबा यांचा निषेध केला आहे. तसंच त्यांच्यावर अद्याप कोणतीही कारवाई झालेली नसल्याबद्दल त्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. आपण आयुर्वेदाच्या नव्हे तर रामदेव यांच्या विरोधात असल्याचं या संघटनेचे अध्यक्ष डॉ. मनिष यांनी स्पष्ट केलं आहे. एनडीटीव्हीशी बोलताना डॉ. मनिष म्हणाले, आम्हाला रामदेव यांच्याशी कोणताही वाद घालायचा नाही. कोण आहे तो? तो एक सामान्य व्यक्ती आहे. त्याने या महामारीच्या काळात फक्त आपला व्यवसाय केला आहे.

आणखी वाचा- Ayurveda vs Allopathy : आयएमएचं योगगुरू रामदेव बाबांना खुल्या चर्चेचं आव्हान!

ते पुढे म्हणाले, या महामारीच्या काळात डॉक्टरांनी रात्रंदिवस काम केलं आहे. अनेकांनी आपला जीवही गमावला आहे. आम्ही दहा हजारांहून अधिक डॉक्टरांना आवाहन करतो की, त्यांनी यात सहभागी व्हावं. आम्ही यासाठी काहीही करायला तयार आहे. आम्ही न्यायालयातही जायला तयार आहोत.
IMA नेही या आंदोलनाला पाठिंबा दिला आहे. या आंदोलनादरम्यान डॉक्टर्स आपल्या कामाच्या ठिकाणी काळा बिल्ला लावून आपला निषेध व्यक्त केला आहे.


काही दिवसांपूर्वी रामदेव बाबांचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. यामध्ये त्यांनी करोनाच्या दोन्ही लसी घेतल्यानंतर देखील एक हजार डॉक्टर मेल्याचा दावा केला होता. “जे स्वत:ला वाचवू शकत नाहीत, ते कसले डॉक्टर?” असा सवाल देखील ते विचारताना दिसले.या व्हिडिओनंतर मोठ्या प्रमाणावर रामदेव बाबांवर टीका होऊ लागल्यानंतर त्यांचा अजून एक व्हिडिओ व्हायरल झाला.

आणखी वाचा- हा माझा नाही, सरकारच्या धोरणांचा दोष; ‘कोरोनील’वर बाबा रामदेव यांनी दिलं उत्तर

यामध्ये, “लोक कधीकधी रामदेवबाबा यांना अटक करण्याचा ट्रेंड सोशल मीडियावर चालवतात तर कधी रामदेवबाबा ठग असल्याचे ट्रेंड चालवतात. चालू द्या, पण आता आपण हे गुण देखील शिकलो आहोत आणि आम्ही जे लोकं जो ट्रेंड चालवितो तो देखील शीर्षस्थानी असतो. अटक तर त्यांचा बाप सुद्धा करू शकत नाही”, असं म्हणताना दिसले.