भारतीय रिझर्व्ह बँकेच्या (आरबीआय) गर्व्हनरपदी उर्जित पटेल यांची नियुक्ती करण्यात आली आहे. उर्जित पटेल हे आरबीआयमध्ये सध्या डेप्युटी गर्व्हनरपदी असून याचवर्षी जानेवारी महिन्यात त्यांची तीन वर्षांसाठी फेरनियुक्ती करण्यात आली होती. तीन सप्टेंबरला राजन यांचा कार्यकाळ संपणार असून त्यानंतर पटेल हे गर्व्हनर पदाचा पदभार घेण्याची शक्यता आहे.
११ जानेवारी २०१३ मध्ये पटेल यांची आरबीआयमध्ये डेप्युटी गर्व्हनरपदी नियुक्ती करण्यात आली होती. त्यांच्याकडे मुद्रा नीती विभागाची जबाबदारी होती. रघुराम राजन यांच्या आधीपासून त्यांनी आरबीआयच्या कामास सुरूवात केली होती. राजन आणि पटेल यांनी वॉशिंग्टन येथे आंतरराष्ट्रीय नाणेनिधीमध्ये (आयएमएफ) एकत्रित काम केले आहे. राजन यांच्या निकटचे सहकारी म्हणून त्यांची ओळख आहे.
२८ सप्टेंबर १९६३ साली जन्मलेल्या पटेल यांनी येल विद्यापीठातून अर्थशास्त्रात पीएच.डी केली आहे. बोस्टन कन्सलटिंग ग्रूपचे ते सल्लागार होते. आरबीआयच्या महत्वाच्या निर्णयात त्यांची मोलाची भूमिका राहिली आहे.
पीएचडी झाल्यानंतर पटेल यांनी १९९० साली आयएमएफमध्ये काम करण्यास सुरूवात केली. त्यानंतर ते आरबीआयमध्ये सल्लागार म्हणून रूजू झाले. या काळात आर्थिक सुधारणांसाठी घेतलेल्या निर्णयात मोलाची भूमिका निभावली. त्यानंतर केंद्रीय अर्थ विभागाचे सल्लागार म्हणून त्यांनी १९९८ ते २००१ या काळात काम पाहिले. २०१३ मध्ये त्यांची डेप्युटी गर्व्हनरपदी तीन वर्षांसाठी नियुक्ती करण्यात आली होती. पटेल यांच्यासमोर वाढत्या महागाईवर नियंत्रण मिळवण्याचे मोठे आव्हान आहे. राजन यांनी ज्याप्रमाणे आपल्या कामाचा ठसा भारतीय अर्थक्षेत्रात उमटवला होता. तशाच कामगिरीची पटेल यांच्याकडून अपेक्षा आहे.