सिगारेटच्या खोक्यावर, बिडी-बंडलावर किंवा कोणत्याही तंबाखू उत्पादनाच्या वेष्टनावर ८५ टक्के जागेत सचित्र ‘वैधानिक इशारा’ छापण्यासाठी भारताकडून करण्यात आलेल्या सक्तीचे जागतिक आरोग्य संघटनेकडून (डब्ल्युएचओ) स्वागत करण्यात आले. येत्या १ एप्रिलपासून केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने सिगारेट व बिडी उत्पादकांना त्यांच्या उत्पादनांच्या वेष्टनावर दोन्ही बाजूला ‘धूम्रपान आरोग्यासाठी घातक आहे’ असा इशारा छापणे बंधनकारक केले आहे. या पार्श्वभूमीवर तंबाखु किंवा आरोग्य याविषयीच्या १६व्या जागतिक परिषदेच्या पहिल्या दिवशी जागतिक आरोग्य संघटनेकडून भारताचे स्वागत करण्यात आले. भारताने तंबाखुजन्य पदार्थांबाबत अशाप्रकारचे नियम सूचित करून सुंदर पाऊल उचलले आहे. तंबाखुजन्य पदार्थांच्या वेष्टनांवर सर्वात मोठ्या आकारात वैधानिक इशारा छापणार भारत हा पहिला देश आहे. यासंदर्भात भारताला भविष्यात जी काही मदत लागेल ती आमच्या संघटनेकडून  पुरविण्यात येईल, असे डब्ल्युएचओच्या असंसर्गजन्य आजार प्रतिबंधक विभागाचे संचालक डग्लस बेटचर यांनी सांगितले. गेल्यावर्षीच्या ऑक्टोबर महिन्यात हा निर्णय सूचित करण्यात आला होता.
तर या परिषदेतील भाषणादरम्यान डब्ल्युएचओच्या महासंचालक मार्गारेट चॅन यांनी भारताचे हे पाऊल म्हणजे राजकीय इच्छाशक्तीचे प्रतिक असल्याचे म्हटले. मात्र, सध्या ज्याप्रकारे बड्या सिगारेट कंपन्यांकडून विविध देशांतील सरकारांना न्यायालयात खेचले जात आहे, ते चिंताजनक असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.
भारतात या आदेशाची अंमलबजावणी करण्यात येऊ नये, यासाठी प्रयत्न करण्यात येत आहे. यासंदर्भात उत्पादकांना अंतिम आदेश देणारी नोटीस अद्याप सरकारकडून काढण्यात आलेली नाही. सर्वसामान्यपणे अंमलबजावणीच्या एक महिना आधी सरकारकडून अशी नोटीस प्रसिद्ध करण्यात येते.
तत्पूर्वी या महिन्याच्या सुरूवातीला महाराष्ट्रातील खासदार दिलीपकुमार गांधी यांनी केंद्रीय आरोग्यमंत्री जे.पी.नड्डा यांना पत्र लिहून या निर्णयासंदर्भात आक्षेप नोंदविला होता. थायलंड या देशाचा अपवाद वगळता जगातील इतर कोणत्याही देशांनी सिगरेटच्या वेष्टनावरील वैधानिक इशाऱ्यासंदर्भात इतके कडक पाऊल उचललेले नसल्याचे त्यांनी पत्रात नमूद केले होते. तर भारतीय उद्योजकांच्या फिक्की या संघटनेनेही केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या निर्णयासंदर्भात प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते. वेष्टनावरील वैधानिक इशाराचा आकार इतक्या मोठ्याप्रमाणात वाढवल्याने देशांतर्गत सिगारेट कंपन्यांच्या भवितव्याला धोका निर्माण होऊ शकतो. तसेच, यामुळे सिगारेट सोडून इतर तंबाखुजन्य पदार्थांना सूट मिळत असल्याचेही फिक्कीचे म्हणणे आहे.
केंद्रातील आरोग्य मंत्रालयाने नुकतीच एक सूचना जाहीर केली होती. या घोषणेनुसार १ एप्रिल २०१५ पासून सर्व सिगारेट व बिडी उत्पादकांना त्यांच्या उत्पादनांच्या वेष्टनावर दोन्ही बाजूला ‘धूम्रपान आरोग्यासाठी घातक आहे’ असा इशारा छापणे बंधनकारक आहे. हा इशारा केवळ अक्षरी स्वरूपात नव्हे तर चित्ररूपातही असणार आहे. सिगारेटच्या खोक्याच्या दोन्ही बाजूंवर असणार आहे. महत्त्वाची गोष्ट म्हणजे त्या चेतावणीने सिगारेटच्या खोक्याचा किमान ८५ टक्के भाग व्यापलेला असणे जरुरीचे आहे.