भारताने कोविड १९ विषाणू प्रतिबंधक लशीचा जागतिक दर्जाचा उत्पादक म्हणून मिळवलेली क्षमता व वेळोवेळी नवप्रवर्तनाचे केलेले प्रयत्न कौतुकास्पद आहेत, अशा शब्दांत जागतिक आरोग्य संघटनेच्या मुख्य वैज्ञानिक सौम्या स्वामीनाथन यांनी कोविड काळातील भारताच्या कामगिरीची प्रशंसा केली आहे.
ग्लोबल बायो इंडिया २०२१ या कार्यक्रमात त्यांनी सांगितले की, करोना साथीविरोधातील लढाई आता महत्त्वाच्या टप्प्यात असून अचानक युरोप व अमेरिकेत रुग्ण पुन्हा वाढत आहेत. अनेक अनिश्चिततांचे सावट असून विषाणूचे वेगवेगळ्या उत्परिवर्तनाचा समावेश असलेले प्रकार सामोरे येत आहेत. भारताने कोविड १९ विषाणू विरोधात लस निर्मितीत जागतिक दर्जाचा उत्पादक म्हणून नाव कमावले आहे. त्यात नवप्रवर्तनाचेही दर्शन घडवले आहे. लशींच्या परिणामांचा साकल्याने अभ्यास करण्याचीही गरज आहे. किमान ३० कोविड १९ प्रतिबंधक लशी सध्या भारतात विविध टप्प्यावर असून कोव्हॅक्सिन ही स्वदेशी बनावटीची लस बायोटेकची आहे तर ऑक्सफर्ड अॅस्ट्राझेनेकाची लस सीरम इन्स्टिटय़ूट ऑफ इंडिया या पुण्यातील कंपनीने कोव्हिशिल्ड नावाने तयार केली आहे. झायडस कॅडिलाची एक लस असून रशियाच्या स्पुटनिक ५ लशीच्या चाचण्या तिसऱ्या टप्प्यात आहेत. ही लस रेड्डीज लॅबोरेटरी तयार करीत आहे. त्यांनी आपत्कालीन परवान्यासाठी भारताच्या महा औषध नियंत्रकांकडे अर्ज केला आहे.
भारताने वेगवेगळ्या देशांना लशीचा पुरवठा केला असून नीती आयोगाचे आरोग्य सदस्य विनोद पॉल यांनी वैज्ञानिक समुदायाने केलेल्या कामगिरीची प्रशंसा केली आहे. करोना विषाणूवर लशी तयार करण्यात भारताने तत्परता दाखवली असे त्यांनी म्हटले आहे. आपण वेगाने लशी तयार करू शकतो व त्याचे वितरणही करू शकतो हे यातून स्पष्ट झाल्याचे त्यांनी सांगितले.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on March 3, 2021 12:25 am