काँग्रेसला कर्नाटकमध्ये धक्का बसल्यानंतर देशातील अनेक नेत्यांनी या निवडणुकीच्या निकालानंतर आपली मते नोंदवली. राष्ट्रीय स्तरावरील भाजप नेत्यांबरोबरच महाराष्ट्रामधील महत्वाचे नेते या निवडणुकीनंतर काय म्हणाले आहेत जाणून घेऊयात.

काँग्रेसच्या घराणेशाहीच्या राजकारणाला चपराक

कर्नाटकच्या मतदारांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सुशासनावर विश्वास ठेऊन, काँग्रेसचे घराणेशाहीचे राजकारण नाकारले असल्याची प्रतिक्रिया भाजप अध्यक्ष अमित शहा यांनी व्यक्त केली आहे. देशातील इतर भागाप्रमाणेच कर्नाटकच्या जनतेने पंतप्रधानांच्या स्वच्छ व पारदर्शी शासनाला ही एक प्रकारे पोचपावतीच दिली असल्याचे शहा यांनी स्पष्ट केले आहे. त्यांनी बी.एस.येडियुरप्प यांचेही कौतुक केले आहे.

काँग्रेसला नाकारले

कर्नाटकमधील जनतेने काँग्रेसला नाकारले आहे. मात्र, जनता दलाला पाठिंबा जाहीर करून काँग्रेस जनतेचा कौल झुगारून सत्ता स्थापनेचा प्रयत्न करत आहे. भाजप हा राज्यातील सर्वात मोठा पक्ष ठरला असून काँग्रेसविरोधी लाटेने जनता दलालाही लाभ झाला आहे. सिद्धारामय्या यांच्याविरोधात जनतेत एवढा रोष होता की त्यांना स्वत:च्या मतदारसंघात पराभव पत्करावा लागल्याचे मत येडियुरप्पा यांनी व्यक्त केले.

कर्नाटकचा निकाल संशयास्पद

कर्नाटक निवडणुकांच्या तोंडावर मी त्या राज्यात गेलो असता तेथे काँग्रेस पक्ष आणि मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्याबद्दल मतदारांच्या मनात सहानभूती दिसत होती. मतदार काँग्रेस आणि सरकारविरोधात बोलताना फारसे आढळले नाहीत. कर्नाटक सरकारने चांगले काम केले असे तेथील शेतकरीदेखील म्हणत होते. असे असताना काँग्रेसविरोधात निकाल लागणे हे आश्चर्यकारक असून हा निकाल संशयास्पद असल्याचे मत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी व्यक्त केले.

काँग्रेसला उशिरा सुचलेले शहाणपण

कर्नाटकात विधानसभा निवडणूक निकालनंतर धर्मनिरपेक्ष जनता दलाला पाठिंबा देण्याची भूमिका काँग्रेसने घेतली आहे. त्यामुळे काँग्रेसने थोडा हेकेखोरपणा सोडला आहे. मात्र हे त्यांना उशिरा सुचलेले शहाणपण आहे. निवडणुकीच्या आधी जनता दलाबरोबर युती केली असती, तर आता कर्नाटकातील निकाल वेगळे लागले असते, असे भारिप-बहुजन महासंघाचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी म्हटले आहे.

काँग्रेसचे बेगडी दलितप्रेम नाकारले

कर्नाटकात काँग्रेसने निवडणुकीच्या अंतिम टप्प्यात दलित व्यक्तीला मुख्यमंत्री करण्याची हवा सोडून दिली. मात्र काँग्रेसचे हे दलितप्रेम बेगडी आहे, हे तेथील समाजाच्या लक्षात आले. दलितांना भाजपविरुद्ध कितीही  भडकविण्याचा प्रयत्न झाला तरी कर्नाटकच्या दलितांनी काँग्रेसचे बेगडी प्रेम नाकारले आहे. हाच कर्नाटकच्या निवडणूक निकालाचा अर्थ आहे, असे केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी म्हटले आहे.

मतदान यंत्राचा विजय असो

इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्राचा विजय असो अशा शब्दांत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी कर्नाटक विधानसभा निवडणूक निकालांवर प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. राज सध्या रायगड जिल्ह्य़ाच्या दौऱ्यावर आहेत.