जागतिक आरोग्य संघटना (डब्ल्यूएचओ), युनायटेड नेशन्स इंटरनॅशनल चिल्ड्रन इमर्जन्सी फंड (युनिसेफ) आणि त्यांच्या इतर सहकारी संस्थांनी करोनासंदर्भातील एक इशारा जारी केला आहे. यामध्ये गरोदर महिला आणि त्यांच्या गर्भात वाढणाऱ्या बाळांसाठी करोना धोका अधिक वाढल्याचे सांगण्यात आलं आहे. डब्ल्यूएचओच्या अहवालामध्ये करोनाचा प्रादुर्भाव वाढल्यास गर्भामधून बाहेर येणाऱ्या बाळांचा मृत्यू दर अधिक असेल असं म्हटलं आहे. हा धोका इतका अधिक आहे की दर १६ सेकंदांनी एक मेलेलं बाळं जन्माला येईल असं अहवालात म्हटलं आहे. २८ आठवडे किंवा त्यानंतर बाळाचा गर्भाशयात किंवा प्रसुतीदरम्यान मृत्यू झाल्यास त्याला वैद्यकीय भाषेत स्टिलबर्थ असं म्हणतात. दर वर्षाला २० लाख बाळांचा मृत्यू होईल असं डब्यूएचओने म्हटलं आहे. विकसनशील देशांमध्ये या पद्धतीच्या मृत्यूचा दर अधिक असेल असंही अहवालात नमूद करण्यात आलं आहे.

डब्ल्यूएचओने प्रकाशित केलेल्या या अहवालामध्ये दरवर्षी २० लाख मेलेल्या बाळांची प्रकरण समोर येतील असं म्हटलं आहे. २८ आठवडे गर्भाशयामध्ये वाढ झाल्यानंतर जन्माआधीच बाळ गर्भाशयामध्ये दगावण्याचा स्टिलबर्थ असं म्हणतात. संयुक्त राष्ट्राच्या आरोग्य संघटनेने मागील वर्षी उप-सहारा, आफ्रिका तसेच दक्षिण आशियामधील चारपैकी तीन प्रकरण ही स्टिलबर्थची होती असं म्हटलं आहे.

युनिसेफचे कार्यकारी निर्देशक हैनरिटा फोर यांनी, “दर १६ सेकंदांनी जगामध्ये कोणत्या ना कोणत्या आईला स्टिलबर्थचे दु:ख सहन करावं लागणार” अशी भीती व्यक्त केली आहे. योग्य काळजी घेणं, प्रसुतीआधी योग्य देखभाल आणि सुरक्षित प्रसुतीसाठी योग्य डॉक्टरांची निवड करणे या माध्यमातून या प्रकरणांची संख्या कमी करता येईल असा विश्वासही हैनरिटा यांनी व्यक्त केला आहे.

करोनाचा संसर्ग वाढल्यास स्टिलबर्थचे प्रमाण वाढेल असं डब्ल्यूएचओने म्हटलं आहे. विकसनशील देशांमध्ये करोनामुळे आरोग्य सेवांवर मोठा परिणाम होईल आणि या सेवा ५० टक्क्यांपर्यंत कमी होईल. ११७ विकसनशील देशांमधील स्टिलबर्थची संख्या दोन लाखांनी वाढेल. स्टिलबर्थचे प्रमाण प्रसुतीदरम्यान सर्वाधिक म्हणजे ४० टक्के इथके आहे. मात्र महिलांनी योग्य पद्धतीने काळजी घेतल्यास आणि योग्य ठिकाणी उपचार घेतल्यास ही संख्या कमी होऊ शकते असं डब्ल्यूएचओने म्हटलं आहे.

उप सहारा आफ्रीका तसेच मध्य आशियामध्ये स्टिलबर्थच्या एकूण आकडेवारीपैकी ५० टक्के प्रकरण ही प्रसुतीदरम्यानची असतात. तर युरोप, उत्तर अमेरिका, ऑस्ट्रेलियामधील ही आकडेवारी केवळ सहा टक्के इतकी आहे. विकसित देशांमधील जातीय अल्पसंख्यांकांमध्ये स्टिलबर्थचे प्रमाण अधिक असू शकते असंही डब्ल्यूएचओने म्हटलं आहे. उदाहर्णार्थ कॅनडातील इन्यूइट समाजातील महिलांमध्ये स्टिलबर्थचे प्रमाण हे इतरांच्या तुलनेत तीन टक्क्यांनी अधिक आहे.