जागतिक आरोग्य संघटनेनं (डब्ल्यूएचओ) करोना व्हायरस संकटाच्या सुरुवातीच्या टप्प्याविषयी माहिती अद्ययावत केली आहे. “वुहानमधील निमोनियाच्या प्रकरणांबाबतचा इशारा चीनने नव्हे तर चीनमधील डब्ल्यूएचओच्या कार्यालयातून देण्यात आला होता,” अशी माहिती जागतिक आरोग्य संघटनेकडून देण्यात आली आहे. तसंच जागतिक आरोग्य संघटनेनं अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे आरोपही फेटाळून लावले आहेत. ट्रम्प यांनी जागतिक आरोग्य संघटनेवर करोनाचा प्रसार थांबविण्यासाठी आवश्यक माहिती पुरविण्यात अपयशी ठरल्याचा आरोप करत संघटनेचा चीनकडे पाहण्याचा मवाळ दृष्टीकोन असल्याचं म्हटलं होतं.

जागतिक आरोग्य संघटनेने सुरूवातीच्या टप्प्यात उचललेल्या पावलांरून टीका झाल्यानंतर त्यांनी ९ एप्रिल रोजी प्रारंभिक टाईमलाईन जारी केली होती. या क्रोनॉलॉजीनुसार हुबेई प्रांताच्या वुहान म्युनिसिपल हेल्थ कमिशननं ३१ डिसेंबर रोजी न्यूमोनियाची प्रकरणं नोंदवण्यात आल्याची माहिती दिली होती, असं संघटनेनं म्हटलं होतं. परंतु ही माहिती चीनच्या अधिकाऱ्यांकडून देण्यात आली होती किंवा अन्य कोणाकडून याबाबत मात्र माहिती देण्यात आली नव्हती. परंतु या आठवड्यात जारी करण्यात आलेल्या नव्या क्रोनोलॉजीद्वारे जागितक आरोग्य संघटनेनं अधिक माहिती दिली आहे. याद्वारे चीनमधील डब्ल्यूएचओ कार्यालयानंच ३१ डिसेंबर रोजी ‘व्हायरल न्यूमोनिया’च्या बाबतीत माहिती दिली असल्याचे संकेत मिळत आहेत. न्यूमोनियाच्या समस्येवर वुहान हेल्थ कमिशनच्या वेबसाइटवर माध्यमांना ही घोषणा केल्यानंतर हे जारी करण्यात आलं. एएफपीनं यासंदर्भातील वृत्त दिलं आहे.

त्यानंतर त्याच दिवशी अमेरिकेच्या साथीच्या रोगांवर नियंत्रण ठेवणाऱ्या आंतरराष्ट्रीय नेटवर्क प्रोमेटच्या एका अहवालाची माहिती घेण्यात आली होती. त्यामध्ये अज्ञात कारणांमुळे होणाऱ्या न्यूमोनियाच्या प्रकरणांबाबत माहिती देण्यात आली होती. यानंतर, जागतिक आरोग्य संघटनेनं १ जानेवारी आणि २ जानेवारी रोजी या प्रसंगी चीनच्या अधिकाऱ्यांकडे माहिती मागवली होती, जी त्यांना ३ जानेवारी रोजी देण्यात आली होती.
“कोणत्याही देशाकडे अधिकृतपणे एखाद्या घटनेची पुष्टी करण्यासाठी, तसंच त्याच्या कारणांच्या बाबतीत संस्थेला अतिरिक्त माहिती देण्यासाठी २४ ते ४८ तासांचा कालावधी असतो,” अशी माहिती जागतिक आरोग्य संघटनेच्या आपात्कालीन कार्यक्रमाच्या (आरोग्य) संचालक मिशेल रेयान यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत दिली.

“संस्थेच्या अहवालाची पडताळणी करण्यासाठी सांगितल्यानंतर चीनच्या अधिकाऱ्यांनी तातडीने जागतिक आरोग्य संघटनेशी संपर्क साधला,” असे रेयान यांनी सांगितलं. यापूर्वी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी चीनशी जवळीक असल्याचा आरोप करत जागतिक आरोग्य संघटनेशी सर्वप्रकारचे संबंध तोडण्याची घोषणा केली होती. तसंच संघटनेचा निधीही रोखणार असल्याचं म्हटलं होतं.