News Flash

…म्हणून भारतात करोना रुग्णसंख्या मोठ्या प्रमाणात वाढतीये; WHO ने सांगितली कारणं

जागतिक आरोग्य संघटनेकडून रुग्णवाढीच्या कारणांची मीमांसा

संग्रहित (Reuters)

जागतिक आरोग्य संघटनेने भारतातील करोना स्थितीचा आढावा घेतला असून देशात वेगाने होणाऱ्या करोना रुग्णवाढीच्या कारणांची मीमांसा केली आहे. जागतिक आरोग्य संघटनेने भारतात करोनाचा वेगाने प्रसार होण्यामागे अनेक गोष्टी कारणीभूत असून काही धार्मिक तसंच राजकीय कार्यक्रम जबाबदार असल्याचं म्हटलं आहे. या कार्यक्रमांमध्ये मोठ्या प्रमाणात गर्दी झाल्यानेच देशात करोनाची दुसरी लाट आल्याचं जागतिक आरोग्य संघटनेने सांगितलं आहे.

जागतिक आरोग्य संघटनेकडून साप्ताहिक माहिती प्रसिद्द करण्यात आली असून यावेळी भारतात ऑक्टोबर २०२० मध्ये बी.१.६१७ करोना विषाणूचा पहिला रुग्ण आढळला होता अशी माहिती दिली आहे. भारतात मोठ्या प्रमाणात होणारी रुग्णवाढ आणि मृत्यू यामुळे बी.१.६१७ तसंच इतर उपप्रकाराच्या भूमिकेसंबंधी अनेक प्रश्न निर्माण झाल्याचंही यावेळी सांगण्यात आलं आहे.

आणखी वाचा- “…किमान सहा ते आठ आठवड्यांचा लॉकडाउन हवा,” ICMR च्या प्रमुखांचं मोठं वक्तव्य

जागतिक आरोग्य संघटनेने दिलेल्या माहितीनुसार, “नुकतंच भारतातील स्थितीसंबंधी करण्यात आलेल्या अभ्यासात अनेक गोष्टी करोनाचा वेगाने प्रसार होण्यासाठी कारणीभूत असल्याचं दिसत आहे. यामध्य करोनाचे वेगवेगळे उपप्रकारदेखील करोनाचा फैलाव करण्यासाठी कारणीभूत ठरले आहेत. याशिवाय मोठ्या प्रमाणात गर्दी झालेले अनेक धार्मिक आणि राजकीय कार्यक्रमही जबाबदार आहेत. यावेळी करोनासंबंधित नियमांचं कोणतंही पालन न करणं एक कारण होतं. दरम्यान भारतात करोनाचा प्रसार होण्यामागे यापैकी कोणती गोष्टी किती जबाबदार ठरली हे व्यवस्थित समजू शकलेलं नाही”.

आणखी वाचा- चिंतेत आणि रुग्णसंख्येत भर… मागील २४ तासांमध्ये करोनामुक्त झालेल्या रुग्णांपेक्षा संसर्ग झालेल्यांची संख्या अधिक

दरम्यान विषाणूच्या बी.१.६१७ या उपप्रकाराला ‘भारतीय’ म्हणण्याचे काहीच कारण नाही कारण जागतिक आरोग्य संघटनेनेही तसे म्हटलेले नाही, असे आरोग्य मंत्री हर्ष वर्धन यांनी म्हटले आहे. बी.१.६१७ हा जागतिक चिंताजनक विषाणू असल्याचे मंगळवारी जागतिक आरोग्य संघटनेने म्हटले होते त्यावर प्रसारमाध्यमांमध्ये भारतीय विषाणू उपप्रकारास जागतिक चिंताजनक विषाणू संबोधल्याच्या बातम्या आल्या आहेत. त्यावर हर्ष वर्धन यांनी संतप्त भावना व्यक्त केल्या. त्यांनी सांगितले की, जागतिक आरोग्य संघटनेने त्यांच्या कागदपत्रात बी.१.६१७ या विषाणूला कुठेही भारतीय उपप्रकार असे संबोधलेले नाही. तरीही प्रसारमाध्यमांनी कुठलीच शहानिशा न करता आरोग्य संघटनेने भारतीय विषाणूच्या उपप्रकारास जागतिक चिंताजनक विषाणू संबोधल्याचे म्हटले आहे.

हर्ष वर्धन यांनी सांगितले की, प्रसारमाध्यमांनी ‘भारतीय उपप्रकार’ हे वापरलेले संबोधन निराधार असून जागतिक आरोग्य संघटनेने असा शब्द प्रयोग केलेला नाही. ३२ पानांच्या अहवालात त्यांनी या विषाणूचा उल्लेख बी १.६१७ असा केला आहे. जागतिक आरोग्य संघटनेच्या अहवालात कुठेही भारतीय विषाणू असा शब्दप्रयोग केलेला नाही.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 13, 2021 8:32 am

Web Title: who says religious political events among factors behind covid spike in india sgy 87
टॅग : Coronavirus
Next Stories
1 “आम्हाला कामचोर, बावळट म्हटलं जातं”; CMO वर आरोप करत UP मधील डॉक्टरांचा सामूहिक राजीनामा
2 प्रत्येक जिल्ह्यात तक्रार निवारण समिती नेमा
3 ‘कोव्हॅक्सिन’च्या चाचण्या  मुलांवर करण्याची शिफारस
Just Now!
X