जगभर हाहाकार माजविलेल्या करोना विषाणूच्या उगमाबाबत चौकशी करण्यासाठी जागतिक आरोग्य संघटनेचे (डब्ल्यूएचओ) १३ आंतरराष्ट्रीय तज्ज्ञांचे पथक गुरुवारी वुहानमध्ये दाखल झाले. मात्र दोन तज्ज्ञांना करोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाल्याने त्यांना सिंगापूर येथून थेट वुहानला आलेल्या विमानामध्ये बसू देण्यात आले नाही.

करोनाच्या उगमाबाबत चौकशी करण्यासाठी १३ आंतरराष्ट्रीय तज्ज्ञांचे पथक गुरुवारी वुहानमध्ये दाखल झाले, आंतरराष्ट्रीय प्रवाशांसाठी असलेले निर्बंध पाळल्यानंतर पथक त्वरित चौकशी करणार आहे, असे डब्ल्यूएचओने ट्वीट केले आहे. पथकातील अन्य दोन तज्ज्ञ अद्यापही सिंगापूरमध्येच असून त्यांची चाचणी केली जात आहे.

प्रवासापूर्वी या तज्ज्ञांची त्यांच्या मायदेशात चाचणी करण्यात आली आणि त्यानंतर सिंगापूरमध्ये चाचणी करण्यात आली तेव्हा दोन जणांना करोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले. त्यामुळे त्यांची पुन्हा आयजीएम आणि आयजीजी प्रतिपिंड चाचणी करण्यात येत आहे. त्यामुळे त्यांना चीनला पाठविण्यात आलेले नाही, असे वृत्त द वॉल स्ट्रीट जर्नलने दिले आहे.

या तज्ज्ञांना १४ दिवस विलगीकरणात ठेवण्यात येणार आहे. हे पथक संशोधन संस्था, रुग्णालये आणि मासे विक्री करण्यात येणाऱ्या बाजारपेठेतील लोकांशी चर्चा करणार आहे. या बाजारपेठेतून करोनाचा सर्वप्रथम फैलाव झाल्याचे सांगण्यात येत आहे. पथकामध्ये अमेरिका, ऑस्ट्रेलिया, जर्मनी, जपान, ब्रिटन, रशिया, द नेदरलॅण्ड्स कतार आणि व्हिएतनाम येथील तज्ज्ञ आहेत.