WHO अर्थात जागतिक आरोग्य संघटनेचं एक पथक पुढच्या आठवड्यात चीन दौऱ्यावर जाणार आहे. या ठिकाणी हे पथक जाऊन करोना व्हायरसचा प्रसार नेमका कुठून सुरु झाला ते तपासणार आहे. सध्याच्या घडीला चीन याबाबतची नेमकी माहिती देण्यास टाळाटाळ करत असल्याने आम्ही हा निर्णय घेतला आहे असंही WHO ने म्हटलं आहे. एएनआय या वृत्तसंस्थेने या संदर्भातले वृत्त दिले आहे.

WHO ने चीनला हे सहा महिन्यांपूर्वीच सांगितलं होतं की करोनाची उत्पत्ती आणि प्रसार नेमका कसा झाला ते आम्हाला सांगा. मात्र चीनकडून समाधानकारक उत्तर आलेलं नाही. त्यामुळे आता जागतिक आरोग्य संघटनेचं एक पथक चीनच्या दौऱ्यावर जाणार असून हे पथकच करोनाचा प्रसार नेमका कसा सुरु झाला याचा शोध घेणार आहे. वुहान हे करोनाचं केंद्र आहे असं चीनने सांगितलं मात्र या व्हायरसची लागण नेमकी मानवाला कशी झाली ते पुरेसं स्पष्ट केलं नाही. जागतिक आरोग्य संघटनेचे महासंचालक टेंड्रोस अँधोनम घेब्रेयेसस यांनी जानेवारी महिन्यातच हे स्पष्ट केलं होतं की लवकरात लवकर चीनने या रोगाच्या उत्पत्ती आणि प्रसाराची माहिती द्यावी… जेणकरुन या रोगाचा जगभरातला प्रसार रोखता येईल. मात्र तसे झालेले नाही. त्यामुळे आता या संघटनेचे एक पथक पुढील आठवड्यात चीनच्या दौऱ्यावर जाणार आहे.

आणखी वाचा- करोनासंदर्भात WHO चा­ चीनवर मोठा आरोप

कोविड १९ मुळे जगभरात ५ लाखांपेक्षा जास्त लोकांचा बळी गेला आहे. तसंच या संख्येत दिवसेंदिवस भरही पडते आहे. दरम्यान पुढील आठवड्यात जो दौरा WHO च्या पथकातर्फे केला जाणार आहे त्याबाबत WHO च्या प्रमुख संशोधक डॉ. सौम्या स्वामिनाथन यांनी एक महत्त्वाचं वक्तव्य केलंय. “पुढील आठवड्यात जे पथक दौरा करणार आहे त्यात आम्ही या व्हायरसचं उगमस्थान शोधण्याचा प्रयत्न करणार आहोत. जेणेकरुन या व्हायरसचा मुकाबला कसा करायचा याबाबत काही माहिती मिळेल अशी आशा आम्हाला आहे. ” सध्या आम्ही चीन सरकारच्या संपर्कात आहोत. प्राण्यातून हा व्हायरस माणसामध्ये कसा आला याचा शोध आम्ही घेणार आहोत असंही त्यांनी स्पष्ट केलं.