करोना व्हायरसने जगभरात थैमान घातलं आहे. या महामारीने आतापर्यंत ४४ लाख लोकांना ग्रासलं आहे तर जवळपास तीन लाख लोकांचा बळी घेतला आहे. रोगावर नियंत्रण मिळवण्यासाठी आणि उपचार शोधण्यासाठी सर्वच देश प्रयत्न करत आहेत. मात्र, अद्याप कोणालाही यश मिळालं नाही. यादरम्यान, WHO (जागतिक आरोग्य संस्था) च्या एका अभ्यासातून असं समोर आलेय की, २०२० ते २०२१ दरम्यान करोना व्हायरसमुळे पाच लाख एड्सग्रस्तांचा मृत्यू होऊ शकतो.

जागतिक आरोग्य संस्थाने केलेल्या मॉडेलिंग अभ्यासानुसार, आणि यूएनएड्सचा (UNAIDS) अंदाजावरून वेळीच उपचार न मिळाल्यास आगामी सहा महिन्यांत आफ्रिकेच्या उप-सहारान भागात एड्समुळे पाच लाख लोकांचा मृत्यू होईल. इतक्या लोकांचा मृत्यू झाल्यास २००८ मध्ये एड्समुळे मरण पावलेल्यांचा हा विक्रम तुटेल.

अँटीरेट्रोव्हायरल (ARV) थेरपीमुळे २०१० पासून आफ्रिकेत मुलांमधील एड्सच्या संक्रमणाचं प्रमाण ४३ टक्क्यांनी घटले होते. पण आता त्यांना योग्यवेळी औषधं आणि थेरपी न मिळाल्यास एड्सग्रस्तांच्या संख्येत वाढ होइल. पुढील सहा महिन्यात मोझांबिकमध्ये ३७ टक्के, मलावी आणि झिम्बाब्वेमध्ये ७८ टक्के आणि युगांडामध्ये १०४ टक्के मुलांना एड्स होऊ शकतो. अशी भिती जागतिक आरोग्य संस्थेनं व्यक्त केली आहे.

आधीच एखादा गंभीर आजार असलेल्या रूग्णांवर करोना व्हायरसचा प्रभाव आधिक होत असल्याचे काही अभ्यासात समोर आलं होतं. त्यात करोनावर मात करण्यासाठी लॉकडाउनही घेण्यात आला आहे. त्यामुळे गोळ्या-औषधं आणि थेरपीवर याचा परिणाम झाला आहे. करोनाचा प्रसार वाढल्यानंतर आफ्रिकेतील आरोग्य व्यवस्था खालावली आहे. HIV क्लिनिकमध्ये ARV पुरविल्या जात नाहीत. परिणामी रूग्णांच्या संख्येत गंभीर वाढ होऊ शकते.