जगभरामध्ये करोनाचा प्रादुर्भाव होऊ दीड वर्षांहून अधिक कालावधी झाला आहे. जगातील अनेक देशांमध्ये सध्या लसीकरण मोहीम सुरु आहे. मात्र असं असतानाही या विषाणूचे नवीन नवीन उपप्रकार म्हणजेच व्हेरिएंट समोर येत असल्याने भय इथले संपत नाही अशीच परिस्थिती पहायला मिळत आहे. जागतिक आरोग्य संघटनेनं आता करोनाच्या नवीन व्हेरिएंटसंदर्भात धोक्याचा इसारा दिलाय. कोलंबियामध्ये आढळून आलेला या विषाणूच्या नव्या व्हेरिएंटचं नाव म्यू असं आहे. या विषाणूचं शास्त्रीय नाव बी वन ६२१ असं आहे. पहिल्यांदा यासंदर्भात जानेवारीमध्ये माहिती मिळाली होती. या विषाणूचा संसर्ग झालेल्या रुग्णांची संख्या ही चार हजारांच्या आसपास असून ते जगभरातील ४० वेगवेगळ्या देशांमध्ये आढळून आले आहेत.

म्यू व्हेरिएटवर मागील काही महिन्यांपासून जागतिक आरोग्य संघटना लक्ष ठेऊन आहे. जागतिक आऱोग्य संघटनेने दिलंल्या माहितीनुसार या विषाणूवर लसही काही कामाची नसून तो लसीचा प्रभाव नष्ट करण्यास सक्षम आहे. इतकच नाही तर या विषाणूचा संसर्गही फार वेगाने होतो. यासंदर्भात अभ्यास करण्याची गरज असल्याचं जागतिक आरोग्य संघटनेनं म्हटलं आहे. या विषाणूचा जागतिक आरोग्य संघटनेनं व्हेरिएंट ऑफ इन्स्ट्रेस्ट प्रकारामध्ये समावेश केलाय. म्हणजेच या विषाणूच्या प्रादुर्भावाचा वेग आणि इतर गोष्टींवर अधिक बारकाईने लक्ष ठेवलं जाणार आहे.

जागतिक आरोग्य संघटनेनं आपल्या अहवालामध्ये, “म्यू व्हेरिएंट जानेवारी २०२१ मध्ये पहिल्यांदा कोलंबियामध्ये आढळून आला. यानंतर म्यू व्हेरिएंटच्या रुग्णसंख्येत वाढ दिसून आली,” असं म्हटलं आहे. हा व्हेरिएंट कोलंबियामधून दक्षिण अमेरिका, यूरोपमधील अनेक देशांमध्ये पोहचला आहे. जागतिक स्तरावर या विषाणूच्या संसर्गाचं प्रमाण हे एकूण संसर्गाच्या ०.१ टक्का इतकं आहे.  डेल्टा व्हेरिएंटबरोबरच म्यु व्हेरिएंटवरही आता जागतिक आरोग्य संघटना विशेष लक्ष देऊन आहे. जागतिक आरोग्य संघटेनं सध्या डेल्टासोबतच अल्फा, बीटा आणि गामा व्हेरिएंटला व्हेरिएंट ऑफ कंन्सर्न म्हणजेच काळजी करण्यासारखे आणि धोकादायक असे करोनाचे उपप्रकार म्हणून वर्गिकृत केलं आहे. त्याचबरोबरच म्यूसोबत इओटा, कापा आणि लॅम्ब्डा व्हेरिएंटला व्हेरिएंट ऑफ इन्स्टेस्टच्या यादीत टाकलं आहे.

व्हेरिएंट म्हणजे काय?

कोणत्याही विषाणूचा एक जेनेटिक कोड असतो. हा कोड म्हणजे एक विशिष्ट प्रकारचं मॅन्यूअल असतं. याच जेनेटिक कोडच्या मदतीने विषाणूचा काय, कुठे आणि कशापद्धतीने संसर्ग करायचा आहे याची दिक्षा ठरते. या जेनेटिक कोडमध्ये सतत लहान लहान बदल होत असतात. अनेक बदल हे फारच नगण्य स्वरुपाचे असतात. मात्र काही बदलांमुळे विषाणूचा प्रादुर्भाव वेगाने होऊ लागतो. युके आणि दक्षिण आफ्रिकेतील व्हेरिएंट हा संसर्गाच्या दृष्टीने फार धोकादायक मानला जातो.