काश्मीरमध्ये एकेकाळी दहशतवादी कारवायांमध्ये सक्रिय असलेल्या आणि नंतर प्रादेशिक सैन्यात जवान म्हणून भरती झालेल्या शहीद लान्स नायक नाझिर वानी यांना मरणोत्तर अशोक चक्र पुरस्कार जाहीर झाला आहे. काश्मीर खोऱ्यातील शोपियामध्ये एका चकमकीत ६ दहशतवाद्यांना कंठस्नान घातल्यानंतर ते धारातीर्थी पडलेले होते.

जवान वानी सुरुवातीला दहशतवादी होते. मात्र, त्यांनी हा मार्ग सोडला आणि ते प्रादेशिक सैन्यात भरती झाले. शहीद झाले त्यावेळी ३४ राष्ट्रीय राय़फल्समध्ये त्यांची नियुक्ती होती. दरम्यान, दहशतवाद्यांशी दोन हात करताना दाखवलेल्या अतुलनिय शौर्याबद्दल त्यांना यापूर्वी दोनदा सेना मेडलने सन्मानित करण्यात आले आहे. कुलगामधील चेकी अशुमजी या गावचे ते रहिवासी आहेत. या ठिकाणी ते आपली पत्नी आणि दोन मुलांसह राहत होते.

अशोक चक्र शांततेसाठी देण्यात येणारा देशातील सर्वोच्च शौर्य पुरस्कार आहे. त्यानंतर किर्ती चक्र आणि शौर्य चक्र हे पुरस्कार येतात. दरम्यान, शहीद वानी यांच्याबरोबरच इतर चार सैन्य अधिकाऱ्यांना आणि जवानांना किर्ती चक्रने तर १२ जवानांना शौर्य चक्र जाहीर झाला आहे.