डेरा सच्चा सौदाचे प्रमुख बाबा राम रहिम यांना १५ वर्षांपूर्वी झालेल्या दोन साध्वींच्या बलात्कार आणि लैंगिक शोषणाप्रकरणी दोषी ठरविण्यात आले आहे. सोमवारी दुपारी १ वाजण्याच्या सुमारास त्यांना शिक्षा सुनावली जाणार आहे. बाबा राम रहिम यांना किमान सात वर्षांची शिक्षा होऊ शकते अशी शक्यता वर्तविण्यात येते आहे.

बाबा राम रहिम यांना शिक्षा सुनावली गेल्यानंतर त्यांचा उत्तराधिकारी कोण असणार याचे काही अंदाज वर्तविले जात आहेत. डेरा सच्चा सौदाच्या प्रमुखपदी राम रहिम यांचा मुलगा जसमीत याला बसविले जाऊ शकते. मात्र त्याचवेळी दुसरी एक शक्यता अशी वर्तविली जाते आहे की बाबा राम रहिम यांची मुलगी हनीप्रीतला डेरा सच्चा सौदाचे प्रमुखपद दिले जाऊ शकते.

हनीप्रीत ही बाबा राम रहिम यांची लाडकी मुलगी आहे. तसेच इतर दोन मुलींच्या तुलनेत राम रहिम हे हनीप्रीतचे जास्त ऐकतात त्यामुळे तिच्याकडे डेरा सच्चा सौदाचे प्रमुखपद जाण्याची दाट शक्यता आहे. राम रहिम यांना चरणप्रीत, अमरप्रीत आणि हनीप्रीत अशा तीन मुली आहेत तर जसमीत हा त्यांचा एकुलता एक मुलगा आहे.

बाबा राम रहिम यांच्याविरोधात जेव्हा चार्जशीट दाखल करण्यात आली होती तेव्हा जसमीत हे त्यांचे उत्तराधिकारी असतील अशी घोषणा करण्यात आली होती. मात्र हे डेरा सच्चाच्या नियमानुसार आता बाबा राम रहिम यांच्या कुटुंबातील सदस्य  प्रमुख पदावर बसू शकणार नाही ही बाब समोर आली त्यामुळे हा निर्णय मागे घेण्यात आला. आता सोमवारी जर बाबा राम रहिम यांना शिक्षा झाली तर त्यांची गादी कोण सांभाळणार याची चर्चा चांगलीच रंगली आहे.

गुरू विपसनाही प्रमुख दावेदार
बाबा राम रहिम यांच्याच डेरा सच्चा सौदाच्या मुख्यालयात काम करणारी गुरू विपसना यांच्या नावाची घोषणाही अध्यक्ष म्हणून केली जाऊ शकते अशीही शक्यता पुढे आली आहे. मागील सात वर्षांपासून विपसना ही बाबा राम रहिम यांच्यासोबत आहे तसेच त्यांच्या निकटवर्तियांपैकी एक मानली जाते त्याचमुळे हनीप्रीत किंवा विपसना या दोघींपैकी एकीला बाबा राम रहिम यांची गादी चालविण्यास मिळण्याची शक्यता आहे.

एक अंदाज असाही वर्तविला जातो आहे की बाबा राम रहिम हे स्वतःच तुरूंगातून सगळा कारभार सांभाळू शकतात. मात्र नेमका काय निर्णय घेतला जाणार हे अद्याप नक्की झालेले नाही.