सुशीलकुमार मोदी यांचा बहुमताचा दावा

बिहार विधानसभेसाठी होणाऱ्या निवडणुकीच्या पाचव्या आणि शेवटच्या टप्प्यातील मतदान गुरुवारी पार पडत आहे. याच वेळी भाजपने राष्ट्रीय लोकशाही आघाडीचा विजय नक्की असल्याचा विश्वास व्यक्त केला आहे. सरकार स्थापनेसाठी आवश्यक असलेल्या १२२ जागांचा जादूई आकडा रालोआने कधीच पार केला आहे. आता शेवटच्या टप्प्याची वाट पाहत आहोत, असे मत भाजपचे नेते सुशीलकुमार मोदी यांनी बुधवारी व्यक्त केले.
मोदी म्हणाले, भाजपच्या नेतृत्वाखालील आघाडीच्या पारडय़ात जनतेने मते टाकली आहेत. त्यामुळे नितीशकुमार काय किंवा अमेरिका राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा आणि पाकिस्तानचे पंतप्रधान नवाज शरीफ काय, बिहारवासीयांचा हा कौल बदलू शकणार नाहीत. १२२ जागांचा जादूई आकडा आम्ही कधीच पार केला आहे आणि दोनतृतीयांश जागा आपला पक्ष आरामात मिळवील.
या वेळी त्यांनी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्यावर कडाडून हल्ला चढवला. ते म्हणाले, बिहारमध्ये नितीशकुमार निवडून यावे असे वाटत असेल तर केजरीवाल यांनी त्यांच्यासाठी संपूर्ण राज्यात फिरून प्रचार करायला हवे होते; पण तसे न करता केजरीवाल फक्त अपेक्षा व्यक्त करीत आहेत.