– धवल कुलकर्णी

“आज गरीब प्रचंड अस्वस्थ आहेत आणि त्यांना उपाशी झोपावे लागते, पंतप्रधान लोकांना दिवे लावायला सांगतात इतपत ठीक आहे पण गरिबांच्या घरात दिवे कोण लावणार?” असा उद्विग्न प्रश्न ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीन (AIMIM) चे अध्यक्ष आणि लोकसभेचे खासदार असदुद्दीन ओवैसी यांनी उपस्थित केला आहे.

लोकसत्ता डॉट कॉमला दिलेल्या विशेष मुलाखतीत औवैसी यांनी प्रत्येक गरीबाच्या खात्यात किमान पाच हजार रुपये केंद्र सरकारने जमा करावेत अशी मागणी केली.

“टाळेबंदीचा सर्वात भयंकर परिणाम हा देशातील गरीब आणि मजूर वर्गावर होत असून केंद्र सरकारने त्यांना मदत देण्यासाठी प्रत्येक गरीबाच्या बँक अकाऊंट मध्ये किमान पाच हजार रुपये याची मदत टाकावी अशी मागणीसुद्धा त्यांनी केली. देशात असे अनेक गरीब आहेत जसे उत्तर प्रदेश, बिहार आणि बंगाल सारख्या राज्यातून हैदराबादमध्ये येणारे मजूर ज्यांचं स्वतःचं बँक अकाउंटही नाही. यांना पोस्ट ऑफिसमार्फत आर्थिक मदत देता येईल. गरिबांना मदत देण्यासाठी सरकारने जे शक्य होईल ते करावे. जर पैसा नसेल तर लोकसभेमध्ये संमत केलेले बजेट रद्द करून वेळप्रसंगी नवीन बजेट मंजूर करावे. कारण शेवटी गरिबांना मदत देणे अत्यंत गरजेचे आहे,” असे ओवैसी म्हणाले.

या सगळ्यांमध्ये गरिबांची अवस्था फार बिकट आहे. माझ्या मतदारसंघात एका गरीब दलित कुटुंबाला मी विचारलं की तुम्ही घराच्या बाहेर का बसताय, सोशल डिस्टन्सिंग का पाळत नाही? त्यावेळेला त्यांनी मला सांगितलं की तुम्ही एकदा आमची घरं तरी बघा आम्ही सोशल डिस्टन्सिंग कसं पाळणार? या गोष्टी बोलणं श्रीमंतांसाठी फार सोपे आहे पण त्या प्रत्यक्षात उतरवून गरिबांसाठी फार अवघड. “या सर्व संकटाचा भयंकर आर्थिक परिणाम विशेषतः गरिबांवर होणार आहे हे विसरून चालणार नाही,” असे ओवैसी म्हणाले. टाळेबंदीमुळे असंघटित क्षेत्रातले लोक जसे ऑटो किंवा टॅक्सी चालवणारे किंवा फेरीवाले यांच्यासमोर फार मोठा प्रश्न आ वासून उभा राहिला आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्वपक्षीय बैठक बोलावली खरी पण या बैठकीला असे पक्ष ज्यांच्याकडे पाचपेक्षा कमी खासदार आहे त्यांना निमंत्रण नाहीये. यामध्ये इंडियन युनियन मुस्लिम लीग, ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीन आणि आसाम बद्रुद्दिन अजमल यांचा समावेश होतो. एआयएमआयएमचे दोन खासदार आहेत. यामध्ये स्वतः 2004 पासून हैदराबाद मधून निवडून येणारे ओवैसी आणि आणि औरंगाबादचे खासदार आणि माजी पत्रकार इम्तियाज जलील यांचा समावेश आहे.

माझ्या स्वतःच्या हैदराबाद मतदारसंघांमध्ये तीनशेच्या पेक्षा जास्त लोकांना करोना झाला आहे आणि तीन मृत्यू झाले आहेत. अख्या देशांमध्ये मुस्लिम समाजाच्या विरोधात विद्वेष निर्माण केला जात आहे आणि तरीसुद्धा आम्ही, इंडियन युनियन मुस्लिम लीग आणि मौलाना अजमल यांच्यासोबत चर्चा केली जाणार नाही. मग तुम्ही कोणत्या पक्षाशी बोलणार? एखाद्या पक्षाचा फक्त एक खासदार जरी असला तरीसुद्धा त्याला या प्रक्रियेमध्ये सामील करून घेणे महत्त्वाचं आहे असं ओवैसी म्हणाले.

त्याचबरोबर अर्थव्यवस्था सुद्धा प्रचंड गर्तेत सापडली असून कराच्या माध्यमातून मिळणारे उत्पन्न हे कमी झाले आहे आणि त्याचमुळे राज्य सरकारांना या संकटाचा मुकाबला करण्यासाठी मदत मिळावी आणि जरूर पडेल तर कर्ज उभारण्यासाठी परवानगी द्यावी अशी मागणी औवैसी यांनी केली आहे.