22 October 2020

News Flash

महागाईचा भडका : जूनमध्ये घाऊक दरांमध्ये 5.77 टक्क्यांची वाढ

ही वाढ मुख्यत: इंधन तेल व भाज्यांच्या चढ्या दरांमुळे झाली असल्याचे सरकारने जाहीर केलेल्या माहितीवरून निदर्शनास येत आहे

( संग्रहित प्रतिकात्मक छायाचित्र )

महागाईचा वाढीचा दर जून महिन्यामध्ये 5.77 टक्क्यांवर पोचला असून मेमधल्या 4.43 टक्क्यांच्या तुलनेत महागाई चांगलीच वाढली असल्याचे दिसत आहे. ही वाढ मुख्यत: इंधन तेल व भाज्यांच्या चढ्या दरांमुळे झाली असल्याचे सरकारने जाहीर केलेल्या माहितीवरून निदर्शनास येत आहे.

होलसेल इन्फ्लेशन किंवा घाऊक महागाईच्या वाढीचा दर एप्रिलमध्ये 3.62 टक्के, मे मध्ये 4.43 टक्के व जूनमध्ये 5.77 टक्के इतका होता. सरकारी डेटानुसार अन्न धान्यांचे दर मे महिन्याच्या 1.60 टक्के वाढीच्या तुलनेत जूनमध्ये 1.80 टक्क्यांनी वाढले. चर याच काळात भाज्यांचे दर मात्र 2.51 टक्क्यांवरून तब्बल 8.12 टक्क्यांनी वधारले. इंधन व उर्जेच्या दरांमध्ये झालेली वाढही मे मधल्या 11.22 टक्क्यांच्या तुलनेत जूनमध्ये 16.18 टक्के झाली. जागतिक बाजारातील घडामोडींमुळे स्थानिक बाजारातही इंधनाचे दर चढे राहिल्याचे सांगण्यात येत आहे. त्यामुळे मुख्यत: भाज्या व इंधनांमुळे घाऊक महागाईचा वाढीचा दर जून महिन्यात भडकल्याचे दिसत आहे.

भाज्यांमध्येही बटाट्याचे भाव आकाशाला भिडल्याचे दिसत आहे. मे महिन्यात बटाट्याच्या महागाईचा दर 81.93 टक्के होता जो जून महिन्यांत 99.02 टक्के या नजीकच्या काळातील उच्चांकावर पोचला. कांदाही महागला असला तरी त्याची वाढ बटाट्याइतकी जास्त नाहीये. मे महिन्यात कांद्याच्या महागाईचा दर 13.20 टक्के होता जो जूनमध्ये 18.25 टक्के इतका चढा राहिला आहे.

डाळींच्या भावांत मात्र घसरण सुरू असल्याचे दिसून आले आहे. जूनमध्ये डाळींचे भाव 20.23 टक्क्यांनी घसरल्याचे सरकारी डेटा सांगतो. महागाईने पाच महिन्यातला उच्चांक गेल्या महिन्यात गाठल्याचे समोर आले असून ती कमी होण्याची चिन्हे सध्या तरी दिसत नाहीयेत. ऑक्टोबर ते मार्च या काळात महागाई 4.7 टक्के इतकी चढी राहील असा अंदाज भारतीय रिझर्व्ह बँकेनेही पतधोरणात वर्तवला होता. रिझर्व्ह बँकेने व्याजाच्या दरांमध्ये पाव टक्क्यांची वाढ करत महागाईचा दर चढा राहील असेही सूचिक केले होते. जागतिक बाजारातील इंधनाच्या व स्थानिक बाजारातील उत्पादनांच्या दरांमधील वाढ यासाठी कारणीभूत असेल असेही सूचित करण्यात आले होते.

एप्रिलमध्ये आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाची किंमत प्रति पिंप 66 डॉलर्स होती जी आता 74 डॉलर्सच्या घरात पोचली आहे. परिणामी महागाईचा आलेख येता काही काळतरी चढताच राहील असाही अंदाज आहे. अर्थात, समाधानकारक पावसामुळे भाज्यांचे दर घसरले तरच घाऊक महागाईचा दर आटोक्यात राहील अशी आशा आहे, अन्यथा तोंडावर आलेल्या सणासुदीच्या काळात सर्वसामान्यांना भडकलेल्या महागाईला तोंड द्यावे लागेल अशी चिन्हे आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 16, 2018 1:43 pm

Web Title: wholesale inflation shoots up tp 5 77 per cent in june
Next Stories
1 पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या भाषणादरम्यान अचानक मांडव कोसळला, १५ जण जखमी
2 भारताच्या सुपरसॉनिक ब्रह्मोस क्षेपणास्त्राची अत्यंत कठोर चाचणी
3 FIFA World Cup 2018 FINAL : …फ्रान्सच्या विजयानंतर केलेल्या ट्विटमुळे किरण बेदी नेटकऱ्यांच्या निशाण्यावर
Just Now!
X