गेल्या सुमारे साडेचार महिन्यांपासून देशाच्या करोनाविरोधातील लढय़ाची सूत्रे हलविणारे केंद्रीय गृहमंत्रालयाचे प्रमुख अमित शाह यांना संसर्ग झाला आहे. त्यांना रविवारी उत्तर प्रदेशमधील गुरुग्राममधील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. संसर्ग झाल्याची माहिती शाह यांनी ट्वीट करून दिली. मात्र शाह यांनी दिल्लीमधील ऑल इंडिया इन्स्टिट्युट ऑफ मेडिकल सायन्सेस (एम्स) रुग्णालयामध्ये उपचार घेण्याऐवजी शेजारील राज्यातील खासगी रुग्णालयाची निवड का केली असा प्रश्न काँग्रेसचे खासदार शशी थरुर यांनी उपस्थित केला आहे.
‘‘करोनाची सौम्य लक्षणे जाणवू लागल्यामुळे मी चाचणी करून घेतली. त्यातून मी करोनाबाधित झाल्याचे स्पष्ट झाले आहे. माझी प्रकृती ठीक आहे, पण डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार मी रुग्णालयात दाखल होत आहे. गेल्या काही दिवसांमध्ये माझ्या संपर्कात आलेल्या लोकांनी विलगीकरणात जावे आणि चाचणी करून घ्यावी,’’ असे ट्वीट शाह यांनी केले. ५५ वर्षीय शहा यांना ताप किवा करोनाची अन्य लक्षणे नसली तरी त्यांना कालपासून थकवा जाणवू लागला होता. त्यानंतर त्यांनी रविवारी सकाळी चाचणी केली. शहा यांना मधुमेह असल्याने त्यांनी डॉक्टरांच्या देखरेखीखाली राहणे आवश्यक असल्याने त्यांना गुरुग्राममधील मेदांता रुग्णालयात दाखल व्हावे लागले आहे. मात्र दिल्लीतील एम्सऐवजी शेजारच्या उत्तर प्रदेशमधील खासगी रुग्णालयात उपचार घेण्याच्या शाह यांच्या निर्णयावर थरुर यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे.
नक्की पाहा >> अमित शाह करोना पॉझिटिव्ह आल्यानंतर भाजापाचे ‘हे’ तीन बडे नेते ‘सेल्फ आयसोलेशन’मध्ये
थरुर यांच्या एका फॉलोअरने त्यांना भारताचे पहिले पंतप्रधान जवाहर लाल नेहरु यांचा एक फोटो ट्विट करत नेहरुंच्या नेतृत्वाखाली दूरदृष्टीने एम्सची स्थापना करण्यात आल्याचे ट्विट केलं. या ट्विटला रिट्विट करुन त्यावर थरुर यांनी प्रतिक्रिया नोंदवली. “खरोखरच, मला प्रश्न पडला आहे की आपल्या गृहमंत्र्यांनी उपचारासाठी एम्सऐवजी शेजारच्या राज्यातील खासगी रुग्णालयाची निवड का केली असावी. सार्वजनिक संस्थांवरील लोकांचा आत्मविश्वास वाढवायचा असेल तर प्रभावशाली व्यक्तींनी अशा संस्थांना पाठिंबा दाखवण्याची आवश्यकता असते,” असं थरुर यांनी ट्विटमध्ये म्हटलं आहे.
True. Wonder why our Home Minister, when ill, chose not to go to AIIMS but to a private hospital in a neighbouring state. Public institutions need the patronage of the powerful if they are to inspire public confidence. https://t.co/HxVqdREura
— Shashi Tharoor (@ShashiTharoor) August 3, 2020
थरुर यांच्या या ट्विटवरुन आता भाजपा समर्थक आणि काँग्रेस समर्थकांमध्ये सोशल नेटवर्किंगवर चर्चा रंगली आहे. भाजपा समर्थकांनी काँग्रेसचे नेते उपचारासाठी खासगी रुग्णालयात दाखल किंवा डिस्चार्ज झालेल्या बातम्यांचे स्क्रीनशॉर्ट शेअर केले आहेत. तर काँग्रेस समर्थकांनी थरुर यांचा मुद्दा योग्य असल्याचे म्हटले आहे. काही तासांमध्ये हे ट्विट १२०० हून अधिक वेळा रिट्विट झालं आहे.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on August 3, 2020 4:24 pm