देशभरात राष्ट्रपतीपदासाठी निवडणुक सुरू असताना पश्चिम बंगालच्या विधानसभेत मतदानासाठी आलेल्या गोरखा जनमुक्ती मोर्चाच्या (जीजेएम) आमदारांना “तुम्ही इकडे का आलात? पुन्हा दार्जिलिंगकडे चालते व्हा, तुम्हाला स्वतंत्र राज्य हवे आहे त्यासाठी तुम्ही आमच्या सरकारची संभावना केली आहे. त्यामुळे तुम्ही आता तुमच्या डोंगरांमध्ये जा आणि तुमचे मत द्या” अशा कटू शब्दांत तृणमुलचे आमदार परेश पाल हे ओरडले. स्वतंत्र गोरखा लॅंडच्या मागणीवरून पश्चिम बंगालमध्ये रान पेटलेले असताना तृणमुल कॉंग्रेसच्या आमदाराने जीजेएमच्या आमदारांवर आगपाखड केल्याने पुन्हा नवा वाद होण्याची चिन्हे आहेत.

विधानसभेतील लॉबीमध्ये जीजेएमचे तीन आमदार सरीथा राय, रोहित शर्मा आणि अमरसिंह राय हे ऱाष्ट्रपतीपदाच्या मतदानासाठी रांगेत थाबलेले असताना आज दुपारी हा प्रकार घडला. दार्जिलिंगच्या विभाजनातून स्वतंत्र गोरखा लॅंड राज्याची निर्मिती करावी या मागणीसाठी जीजेएमच्या नेतृत्वाखाली अनिश्चित काळासाठी राज्यव्यापी आंदोलन छेडण्यात आले आहे. या आंदोलनाचा आजचा ३३ वा दिवस आहे.

यावेळी भाजप प्रदेशाध्यक्ष आणि आमदार दिलीप घोष हे राय यांच्याशी बोलण्यासाठी गेले असता पाल हे घोष यांच्यावरही खेकसले आणि त्यांच्यावर आचारसंहितेचे उल्लंघन करीत असल्याचा आरोपही केला.

याप्रकरणी प्रतिक्रिया देताना घोष म्हणाले, तृणमुलच्या आमदारांची निराशेपोटी अशी अवस्था झाली आहे. इतर आमदारांशी विधानभवनाच्या आवारात असे वागण्याची पद्धत योग्य नसल्याचेही ते म्हणाले. तर पाल याप्रकरणी म्हणाले की, मी असे वागून काहीही चुकीचे केलेले नाही. जर गरज पडली तर मी पुन्हा हजारदा असे बोलेन.