नशिबानं माझ्यासोबतच असं का केलं… सगळं किती सुंदर चाललं होतं…माझं पूर्ण आयुष्यच उदधवस्त करून टाकलंय…या आहेत ऍसिड हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या प्रिती राठी या तरुणीच्या भावना. 
प्रितीवर वांद्रे टर्मिनसवर अज्ञात व्यक्तीने ऍसिड हल्ला केला होता. या हल्ल्यानंतर तिला उपचारांसाठी बॉम्बे रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. ऍसिडमधील काही अंश तोंडात गेल्यामुळे प्रितीला बोलता येत नव्हते. त्यामुळे तिने कागदावर काही प्रश्न उपस्थित करून आपल्या मनात दाटलेल्या भावनांना मोकळी वाट करून दिली होती. प्रितीने विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे तिच्या कुटुंबीयांकडे नव्हती. डॉक्टरांनी केलेल्या उपचारांना प्रितीच्या शरीराने साथ दिली नाही आणि अखेर प्रितीचा उपचारांदरम्यान मृत्यू झाला. सोमवारीच तिचा मृतदेह दिल्लीला नेण्यात आला.
प्रितीवर ज्यावेळी रुग्णालयात उपचार सुरू होते. त्यावेळी मी तिच्याजवळून हालत नव्हतो. तिला कधी कोणत्या गोष्टीची गरज लागेल आणि मी तिथे नसेल, असे व्हायला नको म्हणून मी तिथेच तिच्या जवळ बसून राहायचो. देवाने आमच्यासोबत असं का केल? असा प्रश्न प्रितीचे वडील अमरसिंह राठी यांनी विचारला.
मला आधीचे काहीच आठवत नाहीये. घरामध्ये किंवा त्यादिवशी रेल्वेतून येताना कोणीही माझा पाठलाग करत नव्हतं. मी कोणत्या बोगीमध्ये होते, हे मला आठवत नाही, असे प्रितीने एका प्रश्नाला उत्तर देताना म्हंटले. मी रेल्वेतून खाली उतरल्यावर त्याने मला पाठीमागून हात लावला. मी मागे वळून बघितल्यावर त्याने लगेचच माझ्या तोंडावर ऍसिड फेकले. मी त्याचा चेहराही नीटपणे बघितला नाही, असेही प्रितीने लिहिले होते.