पाकिस्तानकडून राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार पातळीवरील चर्चा रद्द होणे हे दुर्देवी असल्याचे केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी म्हटले आहे. ही चर्चा भारताने नाही तर पाकिस्तानने रद्द केल्याचेही त्यांनी सांगितले.
आम्हाला शेजारील देशांशी चांगले संबंध ठेवायचे आहेत. भारताला पाकिस्तानशी चर्चा करायची होती. पण, पाकिस्तानने ही चर्चा रद्द केली. भारत आणि पाकिस्तानदरम्यानची एनएसए स्तरावरील चर्चा रद्द होणे दुर्देवी आहे, असे राजनाथ सिंह म्हणाले. मात्र, यापुढेही पाकिस्तानसोबत सौदार्हपूर्ण संबंध ठेवण्यासाठी भारत प्रयत्नशील राहणार असल्याचे त्यांनी यावेळी नमूद केले. तसेच भविष्यात पुन्हा पाकिस्तानसोबत चर्चेची शक्यता आहे का असे विचारले असताना जा आणि पाकिस्तानला विचारा. असे राजनाथ यांनी उत्तर दिले.
दरम्यान, पाकिस्तानच्या सुरक्षा सल्लागारांनी भारत दौरा रद्द केल्यावर श्रीनगरमध्ये तणावाचे वातावरण आहे. हुरियतचे जहाल मतवादी नेते सय्यद अली शाह गिलानी यांना श्रीनगर पोलिसांनी नजरकैदेत टाकल्याने फुटीरतावादी कार्यकर्ते रस्त्यावर उतलेत. या कार्यकर्त्यांना पांगवण्यासाठी पोलिसांना बळाचा वापर करावा लागला आहे.