राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार पातळीवरील बैठक पाकिस्तानने रद्द केल्याबद्दल केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी टीकास्त्र सोडले आहे. काश्मीर मुद्दा महत्त्वाचा वाटत होता तर मग उफा येथील चर्चेत का उपस्थित केला नाही, असा सवाल त्यांनी केला आहे.रशियात उफा येथे चर्चेदरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी व नवाझ शरीफ यांच्यात जी काही चर्चा झाली, तो शब्द पाकिस्तानने पाळला नाही असे सांगत राजनाथ यांनी, भविष्यातील चर्चेबाबत पाकिस्तानने ठरवावे असे स्पष्ट केले. चर्चा रद्द होणे दुर्दैवी आहे. मात्र भारताला पाकिस्तानसोबत सौहार्दाचे संबंध ठेवण्याची इच्छा असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.भारताने सुरक्षा सल्लाागार पातळीवरील चर्चेसाठी पाकिस्तानसमोर अट ठेवलेली नव्हती, पाकिस्तानला तसे वाटत होते. त्यामुळे चर्चेस नकार दिला, असेही राजनाथ यांनी स्पष्ट केले. सरकारने याबाबत धरसोडीचे धोरण ठेवल्याचा आरोप काँग्रेसने केला आहे. पुरेशा तयारीअभावी ही परिस्थिती ओढवल्याची टीका काँग्रेस प्रवक्ते अभिषेक सिंघवी यांनी केली. गेल्या दहा वर्षांत द्विपक्षीय संबंध सुधारण्याच्या दृष्टीने जे प्रयत्न झाले त्याला धक्का बसल्याचे सिंघवी यांनी सांगितले.
अमेरिका नाराज
वॉशिंग्टन : पाकिस्तानने भारताबरोबरच्या सुरक्षा सल्लागार पातळीवरील चर्चेतून माघार घेत ती रद्द केल्याने अमेरिका नाराज व्यक्त केली असून या घडामोडी दोन्ही देशांतील संबंधांच्या दृष्टिकोनातून निराशाजनक असल्याचे म्हटले आहे. लवकरच पुन्हा चर्चा सुरू करावी, असे मतही अमेरिकेने व्यक्त केले.परराष्ट्र खात्याचे प्रवक्ते जॉन किरबी यांनी सांगितले, की या आठवडय़ाच्या अखेरीस भारत-पाकिस्तान यांच्यात चर्चा होणार होती. ती रद्द झाली तरी औपचारिक संवाद पुढे नेला पाहिजे. रशियात पंतप्रधान नरेंद्र मोदी व नवाझ शरीफ यांच्यात जी चर्चा झाली, ती सकारात्मक होती, या नेत्यांनी तेथेच सुरक्षा सल्लागार पातळीवरील चर्चेची घोषणा केली होती त्यामुळे आम्हाला आनंद वाटला होता असेही त्यांनी स्पष्ट केले.

‘..त्याशिवाय बोलणी नकोत’
जम्मू: आपल्या देशातील लोकांच्या सुरक्षिततेची किंमत देऊन शेजारी देशाशी संबंध ठेवले जाऊ शकत नाहीत. त्यामुळे पाकिस्तानने सीमेपलीकडील दहशतवाद थांबवल्याशिवाय भारताने त्यांच्याशी बोलणी करू नयेत, असे काश्मिरातील एका प्रमुख मुस्लीम धर्मगुरूने रोखठोकपणे सांगितले आहे. पाकिस्तान स्वत:च स्वत:च्या अस्तित्वासाठी लढत असून, इराण व अफगाणिस्तान हे त्याचे शेजारी देशही त्याच्या भूमीतून जन्माला आलेल्या दहशतवादाचे बळी ठरले आहेत, असे अंजुमन मिन्हाजे रसूल या संघटनेचे प्रमुख सय्यद अथर हुसैन देहलवी यांनी सांगितले.

मुख्यमंत्री सईद निराश
श्रीनगर: भारत आणि पाकिस्तानदरम्यानची बोलणी रद्द झाल्याबद्दल जम्मू-काश्मीरचे मुख्यमंत्री मुफ्ती मोहम्मद सईद यांनी निराशा व्यक्त केली आहे. बोलण्यांमधील हा खंड ‘तात्पुरता’ ठरून दोन्ही देश लवकरच संवाद सुरू करतील अशी आशा  व्यक्त केली.