पुलवामा येथील दहशतवादी हल्ल्यास जबाबदार असलेल्या पाकिस्तानमधील ‘जैश-ए-मोहम्मद’ या संघटनेचा प्रमुख मसूद अझहर याला जागतिक दहशतवादी ठरवण्याच्या भारताच्या प्रयत्नांमध्ये पुन्हा एकदा चीनने खोडा घातला. संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा मंडळात चीनने पुन्हा नकाराधिकाराचा वापर केला. दरम्यान याच मुद्द्यावरुन काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका केली आहे. नरेंद्र मोदी चीनच्या अध्यक्षांना घाबरतात असा टोला त्यांनी लगावला. यावरुन केंद्रीय मंत्री रवीशंकर प्रसाद राहुल गांधींवर टीका केली आहे.

‘राहुल गांधीजी ट्विटरवर परराष्ट्र धोरण ठरवता येत नाही. परराष्ट्र कूटनीती हा गंभीर विषय असून ट्विट करत ते निश्चित करता येत नाही’, अशी टीका रवीशंकर प्रसाद यांनी केली आहे. राहुल गांधी यांनी ट्विट केलं होतं की, ‘दुबळे पंतप्रधान चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग यांना घाबरतात. चीन जेव्हा कधी भारताविरोधात कारवाई करतं तेव्हा एक शब्दही तोंडाबाहेर येत नाही’.

रवीशंकर प्रसाद यांनी राहुल गांधींना राजनैतिक बाबींवर प्रतिक्रिया देताना कसं वागावं किंवा कसं बोलावं याची माहिती नसल्याची टीका केली आहे. ‘राहुल गांधी जास्त वाचन करत नाहीत. आम्हाला वाटलं होतं काँग्रेस पक्षाला इतका अनुभव असताना परराष्ट्र गोष्टींसंबंधी त्यांना योग्य सल्ले दिले गेले असावेत’, असं टोला रवीशंकर प्रसाद यांनी लगावला.

पुढे त्यांनी सांगितलं की, २००९ रोजी युपीएच्या कार्यकाळात चीनने अशाप्रकारे अडथळा आणला होता. त्यावेळी तुम्ही काहीच का बोलला नाहीत ? असा प्रश्न रवीशंकर प्रसाद यांनी विचारला. राहुल गांधींचं ट्विट आज पाकिस्तानात हेडलाइनला असेल असंही ते म्हणाले. यामुळे तुम्हाला आनंद मिळतो असंही पुढे ते म्हणाले.

‘राहुल गांधी आपले चीनसोबत चांगले संबंध असल्याचा दावा करतात. डोकलाम वाद सुरु असताना तुम्ही चीनच्या अधिकाऱ्यांना भेटलात. मानसरोवर दौऱ्यावेळी चीनी अधिकाऱ्यांना तुम्हाला भेटायचं होतं. मग मसूद अझहरविरोधात भूमिका घेण्यासाठी तुम्ही आपल्या संबंधांचा फायदा का घेतला नाही ?’, असा सवार रवीशंकर प्रसाद यांनी विचारला.