उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी नुकतेच अलाहबादचे नाव बदलून प्रयागराज ठेवले. त्यावरून त्यांच्यावर टीका होताना दिसते आहे. मात्र या टीकेला योगी आदित्यनाथ यांनी उत्तर दिले आहे. अलाहबादचे नाव प्रयागराज करणे योग्यच आहे असेही त्यांनी स्पष्ट केले. एवढंच नाही तर विरोधकांवर त्यांनी टीकेचे ताशेरे झाडले आहेत. मला कायम विचारले जाते की अलाहबादचे नाव प्रयागराज का ठेवले? नावात काय आहे? मग मी विचारतो नावात काहीही नाही तर तुमच्या आई वडिलांनी तुमचे नाव रावण किंवा दुर्योधन का ठेवले नाही?

नावाला महत्त्व नाही हा चुकीचा समज आहे. या देशात सर्वाधिक नावं रामाशी संबंधित आहेत. तसेच अनूसुचित समाजातली नावंही रामाशी जोडली गेली आहेत. रामाशी आपले नाव जोडले जाणे ही गौरवशाली परंपरा आहे मग नावाला महत्त्व नाही असे कसे म्हणता येईल? असेही योगी आदित्यनाथ यांनी म्हटले आहे. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी १६ ऑक्टोबरला अलाहाबादचे नाव प्रयागराज करण्या प्रस्तावाला मंजुरी दिली होती. त्यानंतर झालेल्या बैठकीनंतर राज्य सरकारचे प्रवक्ते आणि आरोग्यमंत्री सिद्धार्थ नाथ सिंह यांनी याबाबत घोषणा केली होती. अलाहाबादचे नाव प्रयागराज असेल आणि या निर्णयाला मंत्रिमंडळाने संमती दिल्याचेही त्यांनी सांगतिले होते.

ऋग्वेद, रामायण आणि महाभारत या तिन्हीमध्ये प्रयागराज हा उल्लेख आढळतो. फक्त मंत्रीच नाही तर सामान्य जनतेचीही मागणी होती की अलाहबादचे नाव बदलून प्रयागराज ठेवावे. सगळ्या साधू संतांनीही या गोष्टीसाठी सहमती दर्शवली आणि सर्वांचे मत विचारात घेऊन हे नाव बदलण्यात आले असेही योगी आदित्यनाथ यांनी स्पष्ट केले आहे. अकबराने १५ व्या शतकात प्रयागराजचे नाव बदलून ते अलाहाबाद असे केल होते.