पी. चिदम्बरम यांचा सवाल

नवी दिल्ली : जैश-ए-मोहम्मदचा म्होरक्या मसूद अझर याला जागतिक दहशतवादी घोषित करण्याची प्रक्रिया यशस्वीपणे पूर्ण झाली त्याचा काँग्रेसला आनंद आहे, परंतु नरेंद्र मोदी हेच भारताचे पंतप्रधान असावे अशी पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांची इच्छा का आहे, असा सवाल काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पी. चिदम्बरम यांनी केला आहे.

इंडियन एअरलाइन्सच्या विमानाचे अपहरण करण्यात आल्यानंतर १९९९ मध्ये भाजप सरकारनेच त्याची सुटका केली. मसूद अझरने मुंबईवर दहशतवादी हल्ला केल्यानंतर त्याला जागतिक दहशतवादी घोषित करण्याची प्रक्रिया काँग्रेस/संपुआ सरकारने २००९ मध्ये सुरू केली. आता २०१९ मध्ये ही प्रक्रिया यशस्वीपणे पूर्ण झाली त्याचा आम्हाला आनंद आहे, मात्र मोदी हेच पंतप्रधान असावेत अशी इम्रान खान यांची का इच्छा आहे, असा सवाल चिदम्बरम यांनी ट्वीट केला आहे.

मोदी यांच्या भाजपने सार्वत्रिक निवडणुकीत विजय मिळविला तर भारतासमवेत शांततेची आणि काश्मीर प्रश्नाची चर्चा करण्याची अधिक चांगली संधी उपलब्ध होईल, असे मत इम्रान खान यांनी परदेशी पत्रकारांशी चर्चा करताना व्यक्त केले होते.

पाकिस्तानने मोदी यांच्याशी अधिकृतपणे जुळवून घेतले आहे, असे इम्रान खान यांच्या या वक्तव्यावरून वाटते, असे काँग्रेसने म्हटले आहे.