इराणचे टॉप लष्करी कमांडर जनरल कासिम सुलेमानी यांचा शुक्रवारी अमेरिकेच्या ड्रोन हल्ल्यात झालेला मृत्यू ही साधीसुधी घटना नाही. कासिम सुलेमानी यांच्या मृत्यूचे आखाती देशांसह जागतिक राजकारणात गंभीर पडसाद उमटू शकतात. सुलेमानी यांच्या मृत्यूमुळे दोन देश युद्धाच्या उंबरठयावर येऊन पोहोचले आहेत. सुलेमानी यांच्या मृत्यूमुळे जागतिक राजकारण कसे बदलू शकते? सुलेमानी यांची हत्या इतका गंभीर विषय का आहे? ते आपण समजून घेऊया.

अमेरिकेने केलेल्या ड्रोन हल्ल्यात सुलेमानी यांच्यासह अबु माहदी अल-मुहानदिसचा मृत्यू झाला. इराणच्या मदतीने इराकमध्ये उभ्या राहिलेल्या एका गटाचा तो उपकमांडर होते. इराणमधील सरकारी वृत्त वाहिनीच्या हवाल्याने असोसिएटेड प्रेसने मृतांमध्ये सुलेमानी यांच्या जावयाचाही समावेश असल्याचे वृत्त दिले आहे.

अमेरिकेने थेट ड्रोन हल्ल्याची कारवाई अचानक केलेली नाही. मागच्या आठवडयाभरापासून अमेरिका आणि इराणच्या समर्थनाने इराकमध्ये उभ्या राहिलेल्या सैन्य गटामध्ये संघर्ष सुरु होता. २७ डिसेंबरला अमेरिकेच्या लष्करी तळावर रॉकेट हल्ला करण्यात आला. त्यामध्ये अमेरिकन कॉन्ट्रॅक्टरचा मृत्यू झाला.

जनरल सुलेमानी कोण होते?
कासिम सुलेमानी इराणच्या इस्लामिक रेव्होल्युशनरी गार्ड फोर्सचा प्रमुख होता. गेल्यावर्षी एप्रिलमध्ये अमेरिकेने इराणच्या या आयआरजीसी फोर्सला दहशतवादी संघटनेचा दर्जा दिला होता. सुलेमानी यांच्या नेतृत्वाखाली काम करणारी कद्स फोर्स परदेशात इराणसाठी वेगवेगळया गुप्त मोहिमांची अंमलबजावणी करायची.

सुलेमानी यांच्याकडे १९९८ सालापासून कद्स फोर्सचे नेतृत्व होते. गुप्त माहिती गोळा करण्याबरोबरच कद्स फोर्स परदेशात लष्करीमोहिमा पार पाडते. त्याशिवाय सुलेमानी हे इराणचे सर्वोच्च नेते आयातुल्ला अली खामेनी यांचे अत्यंत विश्वासू सहकारी होते. इराणचे भविष्यातील नेते म्हणून त्यांच्याकडे पाहिले जात होते.

ही हत्या इतकी मोठी घटना का आहे?
इराणच्या राजकारणावर सुलेमानी यांचा प्रचंड प्रभाव होता. त्यामुळेच राजकीय निरीक्षकांनी त्यांची हत्या म्हणजे अमेरिकेच्या उपराष्ट्राध्यक्षांची हत्या करण्यासमान असल्याचे म्हटले आहे.

शांत, संयमी स्वभावासाठी ओळखल्या जाणाऱ्या कासिम सुलेमानी यांच्याबद्दल इराणमध्ये आदराची भावना होती. ते फार कमी बोलायचे. मागच्यावर्षी डोनाल्ड ट्रम्प यांच्या टि्वटवर त्यांनी प्रतिक्रिया व्यक्ती केली होती. “अमेरिकेला पुन्हा धमकावू नका नाहीतर, तुम्हाला गंभीर परिणाम भोगावे लागतील” असे इराणला धमकी देणारे टि्वट ट्रम्प यांनी केले होते.

त्यावर कासिम सुलेमानी यांनी ट्रम्प यांना गॅम्बलर म्हटले होते. “तुम्हाला आमची ताकत आणि क्षमता चांगली ठाऊक आहे. युद्धामध्ये आम्ही किती पारंगत आहोत हे तुम्हाला चांगले ठाऊक आहे. तुम्ही या, आम्ही तुमची वाट पाहतोय” असे सुलेमानी यांनी त्यावेळी म्हटले होते.