माझ्यावर लावण्यात आलेले लैंगिक शोषणाचे आरोप बिनबुडाचे आहेत. माझ्यावर राजकीय हेतूने जाणीवपूर्वक हे आरोप करण्यात आले आहेत. आगामी सार्वत्रिक निवडणूकांच्या आधीच हा प्रकार का सुरु झाला? याच्यामागे काही अजेंडा आहे का? असे अनेक प्रश्न उपस्थित करीत केंद्रीय परराष्ट्र राज्यमंत्री एम. जे. अकबर यांनी आपल्यावरील लैंगिक शोषणाचे आरोप फेटाळून लावले आहेत. माझी पत आणि प्रतिष्ठेला धक्का पोचवणारा हा प्रकार असून याप्रकरणी आरोप करणाऱ्यांवर कायदेशीर करवाई करणार असल्याचेही त्यांनी म्हटले आहे. त्याचबरोबर माध्यमांतील वृत्तांच्या दाखल्यावरुन आपण आपल्या पदाचा राजीनामा देणार नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

#MeToo अभियानात काही पत्रकार महिलांकडून करण्यात आलेल्या लैंगिक छळाच्या आरोपानंतर मंत्री अकबर रविवारी सकाळी भारतात परतले आहेत. विमानतळावरुन बाहेर जाताना पत्रकारांच्या प्रश्नांवर त्यांनी याप्रकरणी लवकरच उत्तर देणार असल्याचे सांगितले. तुम्ही राजीनामा देणार का, असा पत्रकारांनी प्रश्न विचारल्यानंतर त्यांनी त्यावर उत्तर देणे टाळले होते. त्यानंतर त्यांनी काही वेळापूर्वी यावर आपली पहिली प्रतिक्रिया दिली.

अकबर म्हणाले, माझ्यावरील गैरवर्तनावरील आरोप हे खोटे आणि जाणीवपूर्वक करण्यात आले आहेत. आपल्यावरील आरोप मिर्च-मसाला लावून करण्यात आले आहेत. मी सरकारच्या अधिकृत दौऱ्यावर परदेशात गेलेलो असल्याने यावर याआधी प्रतिक्रिया दिली नाही. खोटं जास्त काळ चालू शकत नाही. मात्र, त्यामुळे विष पसरवण्याचे काम केलं जातं. माझ्यावरील आरोप हे अत्यंत दुःखदायक आहेत.

प्रिया रमानी यांनी एक वर्षापूर्वीच या मोहिमेला एका लेखाच्या माध्यमातून सुरुवात केली. यात त्यांनी माझ्या नावाचा उल्लेख केलेला नाही. शुताचा पॉल यांनी म्हटलंय की त्या व्यक्तीने मला कधीही स्पर्श केलेला नाही. शुमा राहा म्हणाल्या की, मीच याबाबत खुलासा केला पाहिजे, त्याचबरोबर आणखी एक महिला अंजू भारती यांनी म्हटलंय की स्विमिंग पूरमध्ये पार्टी करताना त्यांच्याशी चुकीचं वर्तन केलं, मात्र मला पोहायचं कसं हे देखील माहिती नाही. त्याचबरोबर गाझला वहाब या महिलेने माझी प्रतिमा मलिन करण्याचा प्रयत्न केला आहे. कारण, या महिलेच्या आरोपानुसार २१ वर्षांपूर्वी कार्यालयात मी त्यांचा विनयभंग केला मात्र १६ वर्षांपूर्वी मी सार्वजनिक जीवनात पत्रकार म्हणून पाऊल ठेवले, अशा शब्दांत अकबर यांनी आपल्यावर आरोप केलेल्या महिलांच्या आरोपांतील तथ्य सांगण्याचा प्रयत्न केला असून आपल्यावरील आरोप खोटे असल्याचा पुनरुच्चार केला आहे.