अभिनेते आणि मक्कल निधी मैय्यम या राजकीय पक्षाचे प्रमुख कमल हसन हे पुन्हा एकदा आपल्या विधानामुळे वादाच्या भोवऱ्यात सापडले आहेत. पुलवामा हल्ल्यानंतर देशात सर्वत्र राग असताना काश्मीरमध्ये सार्वमत घेण्याची मागणी त्यांनी केली आहे. इतकेच नव्हे तर त्यांनी पाकव्याप्त काश्मीरला स्वतंत्र काश्मीर असेही संबोधले आहे. रविवारी रात्री एका कार्यक्रमात बोलताना त्यांनी आपली भुमिका मांडली.
भारताकडून काश्मीरमध्ये सार्वमत का घेतले जात नाही? सरकार कशाला घाबरतय? असे प्रश्न हसन यांनी सरकारला विचारले आहेत.

सरकारच्या काश्मीर नीतीवरही हसन यांनी प्रश्न उपस्थित केले आहेत. काश्मीर प्रश्नाला भारत-पाकचे नेतेच जबाबदार आहेत, असे सांगताना आपले जवान का शहीद होत आहेत? आपल्या घराचे चौकीदार का मरायला हवेत? असे प्रश्नही त्यांनी उपस्थित केले आहेत. जर दोन्ही देशांचे सरकार व्यवस्थितपणे काश्मीर प्रश्न हाताळला तर कोणत्याही सैनिकाला आपला जीव देण्याची गरज पडणार नाही. नियंत्रण रेषाही नियंत्रणातच राहिल, असेही ते यावेळी म्हणाले.

भारत काश्मीरमध्ये सार्वमत का घेत नाही? भारत सरकारला कशाची भीती वाटतेय? हे सवाल विचारताना हसन म्हणाले, अनेक संघटना ही मागणी करीत आहेत, काश्मीरच्या जनतेला भारतासोबत रहायचे की पाकिस्तानसोबत जायचे याबाबत जनमत संग्रहित करायला हवे. भारत जर स्वतःला चांगल्या देशाच्या रुपात सिद्ध करु पाहत असेल तर आपल्याला सध्याची भुमिका बदलावी लागेल.

लष्कराप्रती आपली भुमिका मांडताना ते म्हणाले, जेव्हा लोक म्हणतात की, जवान काश्मीरमध्ये मरण्यासाठी चालले आहेत, तेव्हा मला खूपच दुःख होते. आपले लष्करही एका जुन्या फॅशनप्रमाणे झाले आहे. एका इंग्रजी वृत्तवाहिनीच्या वृत्तानुसार, कमल हसन यांनी पाकव्याप्त काश्मीरला स्वतंत्र काश्मीर असे संबोधले आहे.